अब्दुललाटमध्ये तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
schedule02 Jan 25 person by visibility 163 categoryशैक्षणिकसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व लाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अब्दुललाटतर्फे तीन ते पाच जानेवारी २०२४ या कालावधीत ’५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ होत आहे अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
डॉ. श्रीनिवास रामानुजन विज्ञान व गणितनगरी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अब्दुललाट येथे हे प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात १२४ हून अधिक प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. शु्क्रवारी, (३ जानेवारी) वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे अध्यक्षस्थानी असतील. जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी दोन वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ व समारोप रविवारी (पाच जानेवारी) दुपारी १.३० वाजता आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने हे प्रमुख पाहुणे आहेत. माजी खासदार निवेदिता माने या अध्यक्षस्थानी आहेत. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य देवेंद्र कांबळे, पंचायत समिती शिरोळ येथील गटशिक्षणाधिकारी भारती कोळी हे स्वागतोत्सुक आहेत.
………………..
ग्रंथ महोत्सवाचेही आयोजन
विज्ञान प्रदर्शनाच्या कालावधीत तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवही या ठिकाणी होत आहे. शुक्रवार ते रविवार या कालावधीत साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडी आहे. सायंकाळी सहा वाजता लेखक राजेंद्र प्रधान यांचा खैंदुळ हा एकपात्री नाट्यप्रयोग आहे. शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता गणित विषय समितीचे अध्यक्ष रमाकांत सरोदे यांचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व वैदिक गणित या विषयावर मार्गदर्शन आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत कवी संमेलन आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आहे.