आमदारांची भन्नाट संकल्पना, जितकं मताधिक्क्य तितकी झाडं लावणार !!
schedule02 Jan 25 person by visibility 131 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : यशाचा आनंद काही औरच असतो. ते यश साजरं करण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगवेगळी असते. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी ही तर ठरलेली. काही जण मेजवानीचे बेत आयोजित करुन विजयाचा लज्जत आणखी वाढवितात. दरम्यान इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आवाडे यांची विजयानंतरची पर्यावरणपूरक संकल्पना साऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. तसेच इतरांनी अनुकरण करण्याजोगी आहे. सगळयात महत्वाचं म्हणजे ‘झाडे लावा-झाडे जगवा’या उपक्रमांना मूर्त रुप देणारी ठरलीय. आवाडे यांनी, निवडणुकीच्या कालावधीत जाहीर केले होते, की ‘निवडणुकीत जेवढे मताधिक्क्य मिळेल तितकी झाडे मतदारसंघात लावण्यात येतील.’
आमदार आवाडे यांनी घोषणा केल्याप्रमाणे, एक जानेवारी २०२५ रोजी नववर्षदिनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. कोराची येथील श्रीराम मंदिर परिसरात रोपांची लागवड केली. विधानसभा निवडणुकीत आमदार आवाडे यांना ५६८११ मतांचे मताधिक्क्य मिळाले आहे. आवाडे यांनी मतदारसंघात तितकी रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. नोव्हेंबर २०२४ मधील निवडणूक आवाडे यांच्यासाठी महत्वाची होती. जिल्हा परिषद, जिल्हा बँक या ठिकाणी काम केलेल्या राहुल आवाडे यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला. त्यांच्या माध्यमातून आवाडे कुटुंबीयांची तिसरी पिढी विधानसभेच्या निवडणुकीत उतरली.
सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यानंतर राहुल आवाडे हे आमदार बनले. तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय झाली. भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी ही निवडणूक लढविली. आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यावर विजय मिळवला. आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ इतकी मते मिळाली तर कारंडे यांना ७५ हजार १०८ मते मिळाली. निवडणुकीत आवाडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे विजयानंतर मताधिक्क्य इतकी झाडे लावण्यास सुरुवात केली.
कोरोची, तारदाळ, खोतवाडी, चंदूर, कबनूर, आणि इचलकरंजी परिसरातून आवाडे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले. हा सारा परिसर हिरवागार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. या साऱ्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वाढ झालेल्या रोपांची लागवड करण्यावर भर आहे. जेणेकरुन ती रोपे जोमाने वाढतील. ज्या त्या भागात कोणत्या झाडांची योग्यरित्या वाढ होते ते लक्षात घेऊन लागवड केली जाणार आहे. या उपक्रमासाठी त्यांना वरिष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
…………………..
“तापमानवाढीच्या समस्येला साऱ्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. मतदारसंघातील स्वयंसेवी संस्था, संघटना, तरुण मंडळे, सार्वजनिक संस्था यांनाही या उपक्रमात सामील करुन घेत आहे. ज्यांना रोपे हवी आहेत, त्यांनी संपर्क साधावा. त्यांना रोपे उपलब्ध करुन दिल्या जातील. मतदारसंघ हरित बनविण्याचा उद्देश आहे. वस्त्रोद्योगनगरी म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. त्या सोबतच झाडाफुलांनी बहरलेला मतदारसंघ ही नवी ओळख इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाला प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न आहे.”
- डॉ. राहुल आवाडे, आमदार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
- ……………………….