भटके गोसावी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा
schedule02 Jan 25 person by visibility 337 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघातर्फे गुरुवारी (२ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार व खून केल्याच्या घटनेतील आरोपांनी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
‘गोसावी समाजातील त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, फाशी द्या फाशी द्या-आरोपींना फाशी द्या,न्याय द्या-न्याय द्या, पिडीतांना न्याय द्या’अशा घोषणा देत गोसावी समाजातील लोक मोर्चात सहभागी झाले. दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजी, जयसिंगपूर, यड्राव, राशिवडे, वडणगेसह जिल्ह्यातील विविध भागातील या समाजाचे नागरिक मोर्चात सहभाग होते.
मोर्चामध्ये आकाश मकवाने (कागल), सखाराम गोसावी (रुकडी), प्रकाश गोसावी (राशिवडे), भोजराज जाधव (कोडोली), संदीप जाधव (रजपूतवाडी), बाळू गोसावी, (लिंगनूर), अशोक गोसावी (शाहूवाडी), नितीन गोसावी (जयसिंगपूर), शेखर गोसावी, सोमनाथ मकवाने आदीसह नागरिक मोठया संख्येने मोर्चात सामील झाले.