महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गटातटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यात समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची गावागावात मजबूत बांधणी झाली आहे.राजे व मंडलिक गटाची युती गत लोकसभा निवडणुकीपासून पाच वर्षांपूर्वीच झाली आहे. नुकत्याच झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीतही आम्ही एकत्र होतो. हाच एकोपा कायम ठेवत राजे - मंडलिक गट येत्या काळात समन्वयाने काम करेल. असे प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांनी केले.
येथे कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कागल येथील मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने विकासात्मक जे काम केले आहे त्या तुलनेत यूपीए सरकारने दहा टक्के सुद्धा काम केलेले नाही. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया.’
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, रमेश माळी, विरेंद्र अनंत फर्नांडिस संजय पाटील, विवेक कुलकर्णी,प्रितम कापसे,विठ्ठल पाटील,प्रकाश पाटील,दत्तामामा खराडे उपस्थित होते. शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी स्वागत केले. प्रा.सुनिल मगदूम यांनी प्रास्ताविक केले. यशवंत माने यांनी आभार मानले.