राहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !
schedule21 Oct 26 person by visibility 187 categoryउद्योग
महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी -: विधानसभेच्या निवडणुकीत हिरावलेला विजयाचा घास…गोकुळच्या जागा वाटपात मिळालेल्या कमी जागा...निवडणुकीच्या तोंडावर गटाशी निगडीत काही जणांनी विरोधी आघाडीत केलेला प्रवेश…यामुळे दूध संघाच्या निवडणुकीत दिवगंत आमदार पी. एन. पाटील गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र गोकुळच्या निवडणुकीत पी.एन. गटाने नेटके नियोजन करत विजयाचा गुलाल उधळला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे तब्बल ३०४४ मते घेत गोकुळमध्ये विजयी ठरले.
राहुल पाटील यांचा विजय हा पी. एन. गटाला बळ देणारा ठरला. तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे. गोकुळ दूध संघावर माजी आमदार पी. एन. पाटील यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. निवडणुकीच्या कालावधीत जागा वाटपाचा विषय असो की, गोकुळ संबधित धोरणात्मक निर्णय…प्रत्येक ठिकाणी पी. एन. यांचा वरचष्मा असायचा. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या यशात पी. एन. यांचाही वाटा मोठाचा. त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील राजकारणही बदलले. राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पी. एन. यांना मानणारे काही जण काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राहुल पाटील, राजेश पाटील यांनी पी. एन. गटाचे नेतृत्व केले. गोकुळची निवडणूकही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. उमेदवारी कुणाला, किती जागा यावरुन अनेक दिवस महायुतीत घमासान सुरू होती. महायुतीमध्ये मित्र पक्षांची संख्या जास्त. या जागा वाटपात पी. एन. पाटील गटाला एक जागा मिळाली. साहजिकच गटात अस्वस्थता निर्माण झाली. राहुल पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. कार्यकर्त्यांची समजूत काढली. उमेदवार म्हणून स्वत रिंगणात उतरले. राहुल पाटील हेच उमेदवार असल्यामुळे कार्यकर्तेही मोठया जिद्दीने आणि ईर्षेने प्रचार केला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठा आहे. सारी यंत्रणा कामाला आली. अटीतटीच्या निवडणकुीत राहुल पाटील यांनी चांगली मते घेत विजयाचा गुलाल उधळला. निकालानंतर रात्री कार्यकर्त्यांनी काढलेली रॅली…गावागावात झालेला जल्लोष हा सारा गटाला बळ देणारा आणि कार्यकर्त्यांची उर्मी वाढविणारा आहे. निकालानंतर राहुल पाटील यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन करतानाचा फोटो साऱ्यांच्याच मनाला स्पर्शून गेला.