इतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule20 Oct 26 person by visibility 23 categoryउद्योग
स्मिता जाधव पदवीधरमधील पहिल्या महिला आमदार होणार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘. करवीरनगरी ही कुस्तीची नगरी, कलेची पंढरी. कोल्हापूरकरांनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केले आहेत. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघात यंदा कोल्हापूरकर इतिहास घडविणार आहेत. सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे हे शिक्षक मतदारसंघातून निवडून येतील तर पदवीधर मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार म्हणून स्मिता जाधव निवडून येतील.’असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त् केला.
पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे व स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात रविवारी पदवीधर व शिक्षक मेळावा आयोजित केला होता. मंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार सुजय विखे पाटील, सुरेश हाळवणकर, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महापौर रुपाराणी निकम, कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
मुख्यमंत्री म्हणाले,‘ शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यांच्या हक्कांसाठी प्रसंगी मध्यरात्रीही धावून जाणारा आणि शासनदरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारा कर्तृत्ववान प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्याची ही महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांनी एकजुटीने काम करून कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीने उच्चशिक्षित, अभ्यासू आणि शिक्षण क्षेत्राची प्रत्यक्ष जाण असलेला उमेदवार दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत सक्षम आवाज मिळण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे.’
…………….
“शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. गरज पडल्यास रात्री बारा वाजताही मुख्यमंत्र्यांना फोन करून शिक्षकांचे काम करून घेईन. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन.
कौस्तुभ गावडे, उमेदवार महायुती पुणे शिक्षक मतदारसंघ