काँग्रेसतर्फे शनिवारी टोलनाक्यावर आंदोलन ! नेतेमंडळी होणार सहभागी !!
schedule31 Jul 24 person by visibility 273 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून, आंदोलन करणार आहेत.
आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. टोलनाक्यावर वाहने मोफत सोडण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनसंबंधी काँग्रेसच्या नेत्यांची ऑनलाइन चर्चा झाली.
काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. काँग्रेसकडून टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन आहे. चक्काजाम आंदोलन करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठनाका, कराड , सातारा, खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन केलं जाणार आहे. रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.
कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी
कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.