अनेक दिवसांचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर…आयटी पार्कसाठी शेंडापार्कमध्ये ३४ हेक्टर जागा मंजूर
schedule06 Mar 26 person by visibility 34 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. कोल्हापुरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. आयटी असोसिएशन, मंत्री, खासदार, आमदार हे सारे जण यासाठी प्रयत्नशील होते. विधीमंडळात या विषयाकडे लक्ष वेधले होते. आय. टी. पार्क विकसित झाल्यानंतर या क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांना कोल्हापुरातच रोजगार मिळणार आहे.
वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठ- मोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठ मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील लाखो आय. टी. क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुणे बेंगलोर मुंबई हैदराबादसह अमेरिका या अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे आय. टी. क्षेत्रातील भूमिपुत्र तरुण-तरुणींना स्थानिकला कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. आत्ता कोल्हापूर विमानतळ आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनही सर्व सोयी आणि सेवा-सुविधांनी युक्त आहे.”
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘ कोल्हापुरातील अद्ययावत आयटी पार्कसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे जाहीर आभार मानत आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील एकूण ३४.३६ हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल.’
आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘आयटी पार्क साकारण्यासंबंधी कोल्हापूरकरांना शब्द दिला होता. त्या वचनाची पूर्तता होत आहे, या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. कोल्हापुरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचे करिअर साकारणार आहे. कोल्हापुरातील असंख्य तरुण, तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महत्वाचं म्हणज आयटी पार्कसाठी आवश्यक सगळया सुविधा कोल्हापुरात उपलब्ध आहेत. राज्य मंत्रीमंडळाने शेंडापार्कमध्ये आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर जागा मंजूर करुन कोल्हापुरात आयटी पार्क साकारण्याला सुरुवात केली आहे. आयटी पार्कसाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. कृषी विभागाकडील जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. राज्य मंत्रीमंडळाने त्या विषयाला मंजुरी देत कोल्हापूरच्या विकासाला आणखी गती दिली आहे.’