म्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर
schedule10 May 26 person by visibility 25 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘रंकाळा तलावात म्युझिकल फौंऊटेन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या म्युझिकल फाऊटेंनच्या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको,’ अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या कामाची आमदार क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत पाहणी केली. आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘ साहित्याचे सर्टिफिकेशन करूनच त्या साहित्याचा वापर प्रकल्पात करावा. प्रकल्पाच्याबाबतीत कोणतीही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. बसविण्यात येणाऱ्या फौंऊटेनची जागा योग्य असावी, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याचा आनंद घेता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होणार आहे त्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा.’
शाहू जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
महायुती सरकारच्या काळात कोल्हापुरात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. कोल्हापूर सांगली पूरनियंत्रण प्रकल्प, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, गांधी मैदान ड्रेनेज लाईन, रंकाळा तलाव म्युझिकल फौंऊटन, शहरातील तालीम संस्था बांधकाम अशी अनेक विकास कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती साजरी होणार असून, या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्याचा उद्देश असून, अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त रवीकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अभियंता फुलारे आदी उपस्थित होते.