महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि मल नि:सारण व्यवस्थेतील नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात नागरिक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातील पाणी पुरवठा नियोजनासंबंधी जवळपास अडीच तास बैठक चालली.
बैठकीच्या प्रारंभीच माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी शहरातील अपुरा पाणीपुरवठा, नियोजनातील विस्कळीतपणा याबाबीवर प्रकाशझोत टाकला. शहरवासियांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करावा असे सांगितले. माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी महापालिकेमध्ये पाणी वितरण नलिका आणि मल निस्सारण नलिका यांचे नकाशे नसल्यामुळे कामात अडचणी संबंधी तक्रार मांडली. माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांनी ज्या भागात मल नि:सारण व्यवस्था नाही अशा भागाचा सांडपाणी अधिभार रद्द करावा अशी मागणी केली. माजी नगरसेविका रुपाराणी निकम यांनी शहरात एक समान पाणीपुरवठा असावा असे निवेदन केले. चंद्रकांत चव्हाण यांनी विनामीटर पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली.
विजय देसाई यांनी फुलेवाडी रिंग रोड परिसरातील अनेक समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. रश्मी साळोखे यांनी अधिकाऱ्यांची अरेरावी कमी न झाल्यास आणि त्यांच्याकडून पाणी वाटपातील अन्याय दूर न झाल्यास नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल असा इशारा दिला.तानाजी जाधव, अनिल पोवार यांनी माजी लोकप्रतिनिधींच्या अनधिकृत नळ जोडण्यांचा अत्यंत गंभीर विषय अधिकाऱ्यांसमोर मांडला. याशिवाय सुनील पाटील, ओंकार गोसावी, गौरव सातपुते, विनय खोपडे, साहिल हवालदार, डॉ.अश्विनी माळकर, प्रा.नीलिमा व्हटकर, यशवंत माने, प्रकाश सरनाईक आदींनी नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या बैठकीत उपस्थित केल्या.
या बैठकीस माजी नगरसेवक विजय खाडे, किरण नकाते, रवींद्र ताम्हणकर, शिवाजी शेटे नरेंद्र राऊत,मंगेश डाकवे, गणेश चव्हाण, राकेश कांबळे, सुनील थारकर, बिपिन मोरे, दयानंद जयकर, दिलीप भोसले, प्रवीणचंद्र शिंदे, गणपत गायकवाड, जयदीप नलवडे, सुभाष माने उपस्थित होते.
............................
“ पाईपलाईन योजनेचे पाणी शहरात एकसारखे वितरित व्हावे यासाठी शाखा अभियंतांना आपापल्या भागाची वेळापत्रके निश्चित करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या भागात अमृतची नवीन पाईपलाईन टाकलेली आहे तिथे नागरिकांनी त्या लाईनवर आपल्या जोडण्या जोडून घ्याव्यात असे आवाहन करणार आहे. शहरातील पाणी चोरी बाबत प्रशासन गंभीर असून त्यावर लवकरच कठोर कारवाई सुरू होईल.”
-हर्षजीत घाटगे, जल अभियंता पाणी पुरवठा विभाग महापालिका