महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळी
schedule11 Apr 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : ‘महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारलेला आहे. तो आचरण्यास विधायक व सुलभ आहे. धार्मिक सहिष्णूता, मानवी प्रतिष्ठा व मानवी समानता ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठीच जोतीरावांनी या सार्वजनिक सत्यधर्माची निर्मिती केली होती. फुलेंचा हा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ म्हणजे मानवी मुक्तीचा जाहीरनामा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातंर्गत फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित “महात्मा फुले यांचा मानवतावादी सत्यधर्म” या विषयावरील व्याखानामध्ये बोलत होते. प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य माळी म्हणाले, ‘महात्मा फुलेंनी त्यांच्या सत्यधर्मामध्ये ईश्वर हा निर्मिकाच्या स्वरूपात स्वीकारला परंतु; कल्पोकाल्पित देवता व त्यांची मूर्तीपूजा, व्रतवैकल्य, प्रारब्ध, संचित, स्वर्ग-नर्क, सत्यनारायण, नशीब, यासारख्या थोतांड गोष्टी नाकारल्या. त्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण व बुद्धीप्रमाण्यावाद स्वीकारला. तो बुद्धीप्रमाण्यावाद त्यांनी स्वकृतीतून आचरणात आणला. उस्मान शेख यांनी जोतीरावांना प्रौढांची शाळा सुरु करण्यासाठी जागा दिलेली होती,’
डॉ.देशमुख म्हणाले, महात्मा फुले हे समतेचे अग्रदूत होते. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवून त्यांची मुक्ती झाली पाहिजे असा आग्रह धरला. यावेळी प्रा. डॉ. प्रल्हाद माने यांचे मनोगत झाले. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानास प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, डॉ. चेतना सोनकांबळे, प्रा. अविनाश भाले, आनंदराव खामकर, डॉ. आर. एम. गरुड, डॉ. एम. के. भानारकर, प्रकाश श्रावस्ती, दीपक शिंदे, डॉ. किशोर खिलारे, गणेश कांबळे, प्रा. प्रियांका जाधववर, मिलिंद सुरुळकर, उदय पोवार, सुशांत पंडित, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते. समीर होवाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.