महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!
schedule06 Oct 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाविकास आघाडीचे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील उमेदवार आमदार जयंत आसगावकर व पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मंगळवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक तसेच शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुना क्लब, पुणे येथे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्यानेत्यांच्या हस्ते दोन्ही उमेदवारांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील म्हणाले, सध्याच्या राजकीय वातावरणात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. या परिस्थितीचा फायदा घेत दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी जीवाचे रान करावे. जयंत आसगावकर हे अनुभवी आहेत, तर हर्षदा देशमुख यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली गर्दी ही विजयाची नांदी आहे. शिक्षक, पदवीधर, एमपीएससी विद्यार्थी आणि तरुण मतदारांशी सातत्याने संवाद साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागावे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रचार यंत्रणेचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी निश्चित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे. आमदार विश्वजीत कदम म्हणाले, सध्याचे वातावरण शासनाच्या विरोधात आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे ताकदीने लढा दिला पाहिजे. आमदार जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ’ शितलदेवी मोहिते-पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.