करवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! !
schedule13 Oct 26 person by visibility 68 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हटली की चर्चेत आणि केंद्रस्थानी असतो तो करवीर तालुका. या तालुक्याच्या अनुषंगाने या निवडणुकीची चर्चा करवीर तालुक्याभोवतीच रंगत असते. या तालुक्यातील ठरावधारक आपल्या तालुक्यातील उमेदवारालाच मते टाकतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा संपूर्ण जिल्ह्याचाच समज झालेला आहे. साहजिकच याचा फटका चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा अशा दूरवरच्या तालुक्यातील उमेदवारांना बसतो. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये अशी चर्चा झालेली आहे. अनेकांनी अशी खंतही व्यक्त केलेली आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, विश्वास नारायण पाटील, राहुल पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची करवीर तालुकासंबंधी बैठक झाली. शिवाय तालुक्यातील सर्वच ठराव धारकांना बोलावून हा डाग कायमचा पुसून काढण्याचा निर्धार झाला. त्यानुसार कोल्हापुरातील पुईखडी येथील संकल्प सिद्धी सांस्कृतिक हॉलमध्ये एकूण ८६५ पैकी ७०० हून अधिक ठराव धारक एकत्र जमले होते. सर्वांनीच उपस्थित नेतेमंडळींना विश्वास दिला की महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच म्हणजे २५ उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करणार. या माध्यमातून यापूर्वीच्या निवडणुकांमधून झालेला या तालुक्याबद्दलचा गैरसमज दूर करण्याचाही निर्धार झाला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आम्ही जरूर वेगवेगळ्या पक्षांचे आणि विचारधारांचे आहोत. परंतु; दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आम्ही सर्वजण महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. आपण सर्वच ठरावधारकांनी एकजुटीने पॅनल टू पॅनल मतदान करूया.’
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, गोकुळच्या हितासाठी एकदिलाने काम करत आहोत. आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय करूया. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत करवीर तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ.’ राहुल पाटील म्हणाले, ‘इतर राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून गोकुळच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. संपूर्ण आघाडीच्या विजयासाठी प्रत्येक ठरावधारकाने जबाबदारीने प्रयत्न करावेत.’
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास म्हणाले, ‘‘करवीर तालुक्यातील सर्व ठरावधारकांनी एकजुटीने संपूर्ण पॅनलच्या विजयासाठी काम करावे. केवळ आपल्या तालुक्यातील उमेदवारांचा विचार न करता आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे.’