पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल
schedule24 Jun 24 person by visibility 673 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना याबाबत नेहमी पत्रकार परिषदा घेणारे समरजित घाटगे आता गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलच्या आधारे २ ते ५ जूनच्या दरम्यान त्यांची २० लाख
रूपयांची फसवणूक झाली आहे. ही मागणी झाल्यानंतर त्याक्षणी त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती. कोल्हापूर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे पती समरजित घाटगे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरचे संबंध असतानाही अजूनही गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळल्या नाहीत ? ज्या बँक खात्यावर हे पैसे वर्ग झाले त्या बँक खात्यांचा शोध अद्याप का लागला नाही? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी माधवी मोरबाळे, रेखा आवळे, पदमजा भालबर, जहिदा मुजावर, शहनाज अत्तार, पूजा साळोखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. याबाबत या सर्वांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनाही निवेदन दिले. या संपूर्ण प्रकाराची तपासणी व कारवाई व्हावी अशी मागणी केली.