नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
schedule23 Feb 26 person by visibility 67 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घरफाळा विभागाने मोठ्या थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी, तसेच नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा नोंद करावेत असे स्पष्ट आदेश आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी घेतला. या बैठकीत आयुक्तांनी, ‘विभागांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, थकबाकीधारकांच्यावर कारवाई करावी.’असे बजावले. नगररचना विभागाला वसुली शंभर कोटीच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी विशेष कॅम्प घ्याव्यात. सरकारी थकबाकी असलेल्या विभागांशी पाणी पुरवठा, घरफाळा विभागाने समन्वय साधून रक्कम वसूल करावी. पाणीपुरवठा विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा खंडित करावा. ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. इस्टेट विभागाची वसुली कमी झाली असून थकबाकीदारांचे दुकानगाळे सील करावेत. जे गाळे रिकामे आहेत त्याची जाहिरात काढावी अशा सूचना केल्या.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाअधिकारी राजश्री पाटील, सहा-आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला उपस्थित होते.