आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेट
schedule14 May 26 person by visibility 20 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२५ बॅचमधील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य प्रकल्पास भेट दिली. या भेटीदरम्यान संघाच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, पॅकिंग व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. तसेच आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून होणारे कामकाज आणि गुणवत्ता राखण्यासाठी घेतली जाणारी काळजी याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा आधार, सहकार क्षेत्रातील संघाचे योगदान तसेच ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील कामकाज, स्वच्छता व नियोजनाची पाहणी करत समाधान व्यक्त केले. तसेच गोकुळ दूध संघाच्या सहकारातील या योगदानाबाबत त्यांनी कौतुक व्यक्त केले. या अभ्यास दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सहकार व दुग्ध व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच सहकार, प्रशासन आणि विकासात्मक योजनांच्या अमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या अभ्यासभेटीमुळे भविष्यात प्रशासकीय कामकाजात निश्चितच मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी डेअरी व्यवस्थापक सुधाकर पाटील, जिल्हा महिला बाल कल्याण विकास अधिकारी सुहास वाईगडे, लक्ष्मण माने व संघाचे अधिकारी अशोक मेहेरे, सचिन जाधव, बाजीराव राणे उपस्थित होते.