ज्ञानाची रोषणाई आयुष्यभर, फटाकेमुक्त दिवाळीतून ग्रंथालय !
schedule04 Nov 23 person by visibility 418 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतषबाजी ठरलेली. फटाक्यांच्या आतषबाजीतून प्रदूषण. प्रदूषणाचा त्रास साऱ्यांनाच. नेमके हेच टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करु या, प्रदूषणमुक्त राहू या आणि त्या पैशातून पुस्तके आणून घरोघरी ग्रंथालय साकारू या, शाळांना पुस्तक भेट देऊ !’अशी संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी मांडली आहे.
पाटील यांनी शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणधिकाऱ्यांना यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे, ‘फटाकेमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करू या. फटाक्यांची आतषबाजी ही क्षणभर राहते. मात्र ज्ञानाची रोषणाई आयुष्यभर टिकणारी असते. फटाके न आणल्यामुळे पैशांची बचत होणार आहे. त्या शिल्लक पैशातून पुस्तके खरेदी करुन ग्रंथालय सुरू करा. विशेषण म्हणजे ही पुस्तके संपूर्ण कुटुंबीयांच्या ज्ञानात भर घालतील. ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरेल.’
फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाल्यास हवा व ध्वनी प्रदूषण टळेल. सण, उत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड मिळेल. विद्यार्थ्यांना पुस्तकाची, वाचनाची गोडी लागेल. असा व्यापक उद्देश ठेवून ‘फटाकेमुक्त दिवाळी अन् घरात ग्रंथालय, शाळांना पुस्तक भेट’हे आवाहन करण्यात आले आहे.