गुरुदेव -कार्यकर्ते हळहळले ! विवेकानंद परिवार गहिवरला !!
schedule04 May 26 person by visibility 185 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मनात प्रचंड वेदना, हृदयात भरुन न येणारी पोकळी आणि मनात मात्र असंख्य आठवणींचे कप्पे …त्यांच्यासोबतच्या एकेक स्मृती जागविताना ‘गुरुदेव -कार्यकर्ते’पैकी कोण हळहळत होतं…कुणाचे डोळे भरुन येत होते…तर कुणाचा हुंदका दाटत होता. ज्या सभागृहात संस्थेच्या सचिवा म्हणून ज्या प्राचार्या शुभांगी गावडे यांनी विविध कार्यक्रम केले….शिक्षक, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले…संस्थेच्या कार्यविस्ताराचा आलेख मांडला, त्याच सभागृहात त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना आणि श्रद्धांजली अर्पण करताना ‘विवेकानंद परिवार’ गहिवरला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत २००८ पासून अर्थात गेली अठरा वर्षे संस्थेच्या सचिव म्हण्ून जबाबदारीने काम करणाऱ्या प्राचार्या शुभांगी गावडे यांचे ३० एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ताराबाई पार्क येथील संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शोकसभेचे आयोजन केले होते. व्यासपीठावरील त्यांची प्रतिमेचा फलक पाहताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. प्रारंभी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना झाली.
या शोकसभेसाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साऱ्यांनीच प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मातृहृदयी प्रशासक आणि संस्कारमूल्यांनी युक्त् मौल्यवान व्यक्तिमत्व् आज आपल्यातून निघून गेले आहे. शिक्षणक्षेत्रातील ज्ञानसूर्याची शलाका, ज्ञानज्योती, चमचमता तारा निखळला आहे. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कौस्तुभ गावडे यांना पाठबळ देणे हीच प्राचार्या गावडे यांना खरी श्रध्दांजली असेल अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, , संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य एस.एम.गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) डॉ. मिलिंद हुजरे, कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख डॉ.श्रीराम साळुंखे, संस्थेचे माजी सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य आर.के.भोसले, शिक्षक नेते दादा लाड, विवेकानंद कॉलेजच्या आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ.श्रुती जोशी, आमदार अशोकराव माने, महाराष्ट्र साहित्य् परिषदेचे रावसाहेब पोवार, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, नागठाणे येथील कृषीभूषण मनोहर साळुंखे, परळी येथील गजानन बोबडे, संस्थेचे माजी विद्यार्थी मधुकर पाटील, ब्रम्हाकुमारी सुनिता, प्रभारी प्राचार्य डॉ.महेश गायकवाड यांनी प्राचार्या गावडे यांच्या व्यक्तिमत्वाला व कार्याला उजाळा दिला. यावेळी प्रा.महेश हिरेमठ यांनी अभंग सादरीकरण केले. प्रा.अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ.सुप्रिया पाटील, डॉ. कविता तिवडे यांनी सूत्रसंचालन केले.