ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध
schedule18 Aug 26 person by visibility 31 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतनीकृत ‘गोकुळ शॉपी’चे उद्घाटन करण्यात आले.
नूतनीकृत शॉपीला आकर्षक आणि सुसज्ज स्वरूप देण्यात आले आहे. येथे ग्राहकांना गोकुळचे दूध तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच लस्सी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी शॉपीमध्ये ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले म्हणाले, “गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादने हीच गोकुळची ओळख आहे. गोकुळने गुणवत्तेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हे गोकुळचे प्राधान्य आहे. ग्राहकांच्या सोयीचा विचार करूनच ताराबाई पार्क येथील गोकुळ शॉपीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.”
या शॉपीमध्ये गोकुळचे दूध, दही, ताक, लस्सी, बासुंदी, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, पनीर, तूप, टेबल बटर, कुकिंग बटर, दूध पावडर, पेढा, फ्लेवर्ड मिल्क, गुलाबजामून,चीज, आईस्क्रीम यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. याप्रसंगी गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सिव्हील व्यवस्थापक प्रकाश आडनाईक, बाजीराव राणे, डॉ.एम.पी.पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपी चालक मंगेश गुरव उपस्थित होते.