सिद्धार्थनगर पूरसंरक्षक भिंतीस १ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर : राजेश क्षीरसागर
schedule14 Sep 23 person by visibility 325 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सरकारच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास १ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर करण्यात असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. सिद्धार्थनगर येथे जयंती नदीला २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी सिद्धार्थनगर मधील नागरी वस्तीत येवून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्याचे, इमारतींचे आर्थिक नुकसान झाले होते. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात या भागातील नागरिकांची घरे बाधित होतात. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांना केली होती. क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. हा प्रश्न मार्गी लागला असून याबाबत शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे स्थानिक नागरिक आणि कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक पार पडली. पूर संरक्षक भिंतीसाठी निधी मंजूर झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
सिद्धार्थनगर येथील लिंगायत स्मशानभूमी जवळील विकी कांबळे यांचे घरापासून सिद्धार्थनगर कमानीलगत शिर्के धट्टी पर्यंत सिद्धार्थनगर कडील बाजूस अंदाजे १०५.०० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाने सादर केला होता. त्याचे अंदाजपत्रक तयार करून निधी मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने या कामास जिल्हा नियोजन समिती नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून या कामास १ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून, तात्काळ या कामास सुरवात करण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.या विकास कामाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या हस्ते शनिवारी,(१६ सप्टेंबर २०२३) दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी शहरअभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिली.
यावेळी जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, महावितरणचे कार्यकारी अभियंता माने, शिवसेनेचे निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, सुकुमार सोनी, वसंत लिंगनूरकर, अरुण सावंत, सुरक्षा सोनी उपस्थित होते.