केडीसीसीचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे यांचा भाजपात प्रवेश
schedule01 Nov 25 person by visibility 59 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे , चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे उपस्थित होते.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले अप्पी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या कार्यक्रमात नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे नेसरीकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांशी नाळ जुळलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळाली आहे असे नमूद केले.
अप्पी पाटील यांनी, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजी पाटील यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याचे सांगितले. या पुढील काळात आम्ही दोघे मिळून प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अंबरीश घाटगे, अशोक चराटी, अरुण देसाई, पी जी शिंदे, संभाजी आरडे, डॉ. आनंद गुरव, शिवाजी बुवा, के एस चौगले उपस्थित होते.