मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पाच तास विलंब, ऐनवेळी नावे घुसडण्याचा प्रकार
schedule01 Jul 26 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मंगळवारी, ३० जून २०२६ रोजी मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पार पडली. ११५ मुख्याध्यापकपदाच्या पदोन्नतीसाठी आयोजित या प्रक्रियेसाठी दीडशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते. नियोजत वेळ सकाळी अकराची असताना पदोन्नती प्रक्रियेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. पाच तास विलंब झाल्यामुळे शिक्षकांना तिष्ठत थांबावे लागले. शिवाय पदोन्नती यादीमध्ये ऐनवेळी काही नावे घुसडण्याचा प्रकार झाला. त्याला शिक्षक व संघटनांनी विरोध केला. यामुळे पुन्हा मूळ यादीतील नावासहित प्रक्रिया पार पडली.
दरम्यान मुख्याध्यापकपदासाठी पदोन्नती देताना टीईटी पास झालेल्या शिक्षकांना प्राधान्य दिले. दुसरीकडे सिनीअर शिक्षकांची सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली. यासंबंधीही तक्रारी झाल्या. मात्र प्रशासनाने सरकारी नियमाकडे बोट दाखवित प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया झाली. रात्रीपर्यत ही प्रक्रिया सुरू राहिली. दरम्यान या पदोन्नती प्रक्रियेतंर्गत मुख्याध्यापकपदी नियुक्तीही करण्यात आल्या. मुख्याध्यापकपदी पदोन्नतीमध्ये प्रसाद पाटील हिरवडे खालसा, सर्जेराव सुतार कांडगाव, मारुती लांबारे म्हाळुंगे, मनोज गुरव कांचनवाडी, भिमराव कांबळे हसूर दुमाला, वल्लभ शिंदे सांगरुळ, किशोर कुंभार म्हालसवडे, मनोज गुरव कांचनवाडी, कैलास बडे कुडित्रे फॅक्टरी, सौरभ दाभाडे कणेरीवाडी, अनिल पाटील नेर्ली, विकी जाधव बाजारभोगाव केंद्र शाळा, सोनम प्रधान शिंदेवाडी, पूजा सातपुते कोथळी, शुभांगी माळी सांगवडे, सुक्रांती कांबळे शिरोली दुमाला, सचिन धस पाटपन्हाळा आदींचा समावेश आहे.