गणेशोत्सव महाप्रसाद कार्यक्रमात गोळीबार, करवीर तालुक्यातील प्रकार
schedule03 Sep 22 person by visibility 1116 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
गणेशोत्सवातील महाप्रसाद कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी पंगतीला पाणी सोडण्याच्या कारणावरुन करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन गटात वादावादी झाली. वादावादी वाढत जाउन गोळीबाराचा प्रकारही घडला. यातून दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत चौघे जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई सुरू केली आहे.
मांडरे गावात हनुमान तरुण मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. शुक्रवारी रात्री महाप्रसादाच्या कार्यक्रमात पहिली पंगत बसली. जेवण सुरू करण्यापूर्वी पाणी सोडण्याचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात ज्या व्यक्तीला मान असतो त्या व्यक्ती ऐवजी दुसरी व्यक्ती पाणी सोडत असताना एका गटाने आक्षेप घेतला. त्यातून वादावादी सुरू झाली. अभिजीत सुरेश पाटील याने त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नसतानाही बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला. यावळी उदय सोनबा पाटील हा बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला. त्यातून दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटात मोठी मारामारी झाली. दगड, काठ्यांचा वापर झाला. त्यामध्ये उदय सोनबा पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले.
करवीर पोलिसांना गोळीबाराची माहिती कळताच त्यांनी तातडीने गावाकडे धाव घेतली. पोलिसांनी संशयीतांची धरपकड सुरू केली. त्यामध्ये अभिजीत सुरेश पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील , विकास बाजीराव पाटील, दादासो श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णा पाटील, तुषार राजाराम पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयीतांना अटक केली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.