डॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
schedule07 Jun 26 person by visibility 53 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित “राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र” या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती "राजर्षी शाहू महाराज: अ कन्साईज बायोग्राफी" या पुस्तकाचे प्रकाशन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा राज्यातील साखळी येथील रवींद्र भवन येथे झाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "डॉ. जे. के. पवार सरांनी मराठी भाषेमध्ये साकारलेले राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आता इंग्रजीत उपलब्ध झाल्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे.’
प्राचार्य डॉ. जे. के. पवार म्हणाले, "राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यासपूर्ण, सुबोध आणि प्रेरणादायी आढावा घेतला आहे. इतिहास केवळ घटनांचा क्रम नसून तो समाजपरिवर्तनाचा मार्गदर्शक विचार असतो, हे या पुस्तकातून प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचे, प्रगतीशील धोरणांचे आणि समताधिष्ठित दृष्टिकोनाचे दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडेल.’
या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील जनसंपर्क अधिकारी आणि ई ॲंड टीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी केला आहे. ते म्हणाले "मूळ ग्रंथातील आशय, ऐतिहासिक संदर्भ आणि विचारांची ताकद जपण्याचा प्रयत्न केला आहे. गोवा राज्यात या ग्रंथाचे प्रकाशन होणे ही शाहू विचारांच्या प्रदेशसीमांच्या पलीकडे होत असलेल्या प्रसाराची महत्त्वपूर्ण नोंद आहे. " याप्रसंगी कार्यक्रमास सचिवालय, मुंबई येथील अवर सचिव राजकुंवर डफळे-पवार, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील, संचालक प्रा. डॉ. अजय चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. प्रा. डॉ. महादेव कांबळे यांनी स्वागत केले. बांधकाम व्यावसायिक रणधीर पाटील यांनी आभार मानले.