
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील जगदगुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व
रूग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या होमिओपॅथी विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची २०२३-२०२८ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडणूकीत मेडीसीन विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरचे डॉ. विठ्ठल धडके, डेन्टल विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी वाय. एम. टी. डेन्टल कॉलेज, नवी मुंबईच्या डॉ. विभा हेगडे तर आयुर्वेद विद्याशाखेच्या अधिष्ठाता म्हणून सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिकचे डॉ.
मिलींद आवरे यांची बिनविरोध निवड झाली.
राज्यातील ४७५ वैद्यकिय /डेंटल/आयुर्वेद/होमिओपॅथी व इतर वैद्यकिय क्षेत्रांशी निगडीत असलेली महाविद्यालये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर व कोल्हापूर ही विभागीय केंद्र कार्यान्वीत आहेत.
विभागीय केंद्र कोल्हापूरसाठी येत्या ५ वर्षात ३ ते ४ एकर शासकीय जमीन उपलब्ध करण्यासाठी
पाठपुरावा करणे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नावे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये सुरू करण्याचा मानस डॉ. राजकुमार पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. राजकुमार पाटील यांनी याच कॉलेजमधून पदवी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शाहू इन्स्टिटयुटमधून रुग्णालय
व्यवस्थापनाची पदविका घेतली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहेत. सध्या ते महाराष्ट्र कौन्सिल ऑफहोमिओपॅथी, मुंबईचे माजी अध्यक्ष आहेत.