अमृत महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कारांचे वितरण
schedule20 Oct 23 person by visibility 351 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतात लोकसंख्येचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. समाजाचा, देशाचा विकास जलद गतीने करण्यासाठी मुलांना वाव दिल्यास तसेच महिलांना विविध ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास साधने शक्य आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
युनिसेफ आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात एकमेव पंचायत समिती कागल अंतर्गत बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अमृत महाआवास योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या ग्रामपंचायत तसेच घरकुल प्रमुखांचा पुरस्कार देवून सन्मान व सत्कार करण्यात आला. खासदार संजय मंडलिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे प्रमुख पाहुणे होते. ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, गट विकास अधिकारी सुशील संसारे तसेच सरपंच, ग्रामसेवक, प्रेरक, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बालकांच्या नजरेतून गावाकडे पाहताना बालसंवाद या पुस्तकाचे विमोचन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार मंडलिक यांनी कागल तालुक्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्यामुळे तो राज्य व देशात राबवण्यास मार्गदर्शक ठरेल असेही असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेली बालसंवाद पुस्तिका चांगल्या प्रकारे मुलांना व पालकांना मदत करेल .’ असे नमूद केले. गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी प्रास्ताविक केले. अमोल पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान अमृत महाआवास अभियान 3 ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामपंचायत पुरस्कार बेलवळे खुर्द प्रथम क्रमांक, पिराचीवाडी द्वितीय क्रमांक, चिखली ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रधानमंत्री आवास सर्वोत्कृष्ट घरकुल यामध्ये चिखली मधील विलास कांबळे प्रथम क्रमांक, निढोरी ग्रामपंचायतमधील अक्काताई कांबळे द्वितीय क्रमांक, बेलवळे बुद्रुक मधील सरस्वती पाटील यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार ठाणेवाडी मधील अनुसया घोटणे, हमिदवाडा ग्रामपंचायतमधील वैभव गंदुगडे व बोरवडे ग्रामपंचायत मधील सुखदेव डाफळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अटल बांधकाम मधून पुरस्कार देण्यात आला.