संवाद औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !
schedule06 Sep 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वार - रविावर (सहा सप्टेंबर २०२६), वेळ - सायंकाळची. स्थळ -शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निवासस्थान… विद्यापीठ कॅम्पसमधील वीसहून अधिक विद्यार्थ्यासोबत कुलगुरू डॉ. राजनीश कामत उच्च शिक्षण, संशोधन, करिअरच्या संधी अशा विविध विषयावर गप्पा मारत आहेत. विद्यार्थ्यांच्यासोबतच मनमोकळया गप्पांचा हा औपचारिकतेपलीकडचा संवाद खूप काही शिकवून देणारा ठरला. विद्यार्थ्यांसाठी तर ही हृदय भेट ठरली. कधी कधी सर्वोत्तम संवाद हे औपचारिक व्यासपीठाबाहेरच घडतात याची प्रचिती उपस्थितांना आली.
दोन दिवसापूर्वी कुलगुरू डॉ. कामत यांच्या उपस्थितीमध्ये पदार्थ विज्ञान विभागात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात कुलगुरू कामत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं. औपचारिकेपलीकडील संवादाचे आणि कुलगुरुंच्या निवासस्थानी भेटीचं. त्यानुसार पदार्थ विज्ञान विभागातील वीसहून अधिक विद्यार्थी रविवारी, कुलगुरुंच्या निवासस्थानी पोहोचले.याप्रसंगी कुलसचिव व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.
कोणतेही व्यासपीठ नाही, ठरलेला अजेंडा नाही — फक्त मनमोकळा संवाद, प्रश्न आणि स्वप्नांची देवाणघेवाण. करिअरच्या वाटांपासून ते संशोधनाच्या आवडीपर्यंत आणि भविष्याच्या दृष्टिकोनापर्यंत, विद्यार्थ्यांनी आपल्या उत्साहाने, जिज्ञासेने आणि प्रामाणिक विचारांनी चर्चा झाली. विद्यार्थ्यांनीही मनमोकळेपणाने बोलले. उच्च शिक्षण, संशोधन प्रकल्प, करिअर अशा विविध गोष्टीवर खुलं होताना त्यांनी कुलगुरू कामत यांच्या संशोधन, प्राध्यापक ते कुलगुरुपर्यंतचा प्रवास यासंबंधी जाणून घेतले.
‘औपचारिकतेपलीकडचा संवाद: विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा ’यावर बोलताना कुलगुरू कामत यांनी अतिशय प्राजंळपणे भावना व्यक्त केल्या. ‘अशा क्षणांमुळेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव होते. हे विद्यार्थी केवळ शिवाजी विद्यापीठाचे भविष्य नाहीत, तर आजही ते विद्यापीठाला घडवत आहेत. त्यांचा उत्साह आणि विचारपूर्ण प्रश्न पाहून समाधान वाटले. असे संवाद आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतात आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टीची — विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची — आठवण करून देतात.’