कॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शन
schedule05 Sep 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वतःचा स्किलसेट विकसित केला पाहिजे. रेझ्युमे हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, ज्ञानाची आणि क्षमतांची पहिली ओळख असते. त्यामुळे तो वास्तववादी, स्पष्ट आणि प्रभावी असावा.महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाबाहेरील तंत्रज्ञान स्पर्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःसाठी उत्तम करिअरच्या संधी निर्माण करू शकतात.’असे मत 'मायक्रोसॉफ्ट'चे कॅम्पस रिक्रुटमेंट स्पेशालिस्ट अकिब शेख यांनी व्यक्त केले.
’श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. इन्स्टिट्यूटच्या पदवी व डिप्लोमा विभागातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्याध्यक्ष साळुंखे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित केली पाहिजेत. मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उद्योगविश्व समजून घेण्यासाठी आणि आपल्या करिअरची योग्य दिशा ठरविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक विरेन भिर्डी म्हणाले ‘विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशानेइन्स्टिट्यूटमध्ये सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल.’इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी प्रमुख वक्ते अकिब शेख यांचा परिचय करून दिला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे संचालक . यावेळी डॉ. पूर्वा वाइंगणकर उपस्थित होते. प्रा. आरती चव्हाण आणि प्रा. रोहिणी रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. करण पाटील यांनी आभार मानले