रयत केंद्रबिंदू मानणाऱ्या शाहू महाराजांना विजयी करा -युवराज्ञी संयोगिताराजे
schedule02 Apr 24 person by visibility 404 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा विचार घेऊन विद्यमान अधिपती श्रीमंत शाहू महाराज कार्य करत आहेत. ज्या ज्या वेळी समाजावर संकटे आली, त्या त्या वेळी छत्रपती घराणे पुढे आले आहे. यावेळी समाजात समतेचा विचार कायम राखण्यासाठी शाहू महाराज जनतेच्या हितासाठी निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे रयत केंद्रबिंदू मानणाऱ्या शाहू महाराजांना विजयी करा असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील परिते जिल्हा परिषदेतील कुर्डू, कोथळी, कुरुकली,
म्हाळुंगे, परिते गावांचा प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी तेजस्विनी राहूल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, कोल्हापूरच्या रणरागिणी ताराराणी यांचा वारसा आपला आहे. त्यामुळे महिलांना निर्णय घेणाऱ्या बनल्या पाहिजेत. समाजात दंगली वाढत आहे, महिला असुरक्षित आहेत, जातीय द्वेष पसरविले जात आहेत. त्यामुळे महिलांना विनंती आहे, जसे आपण आपला स्वयंपाक करताना भाजी स्वतः काळजीपूर्वक निवडता तसे मतदान करताना काळजीपूर्वक सक्षम उमेदवार निवडा. आणि विचार केला तर सक्षम उमेदवार म्हणून शाहू महाराजच दिसतील.
तेजस्विनी राहुल पाटील म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्याईतून उतराई होण्याचा एक पाऊल म्हणून सर्वांनी इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हात चिन्हावर निवडणुकीला उभे आहेत. त्यांना तकदीने निवडून देऊया.प्रचार दौऱ्यात गावागावात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेमंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.