+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे adjust बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार adjustग्रामसेवकांच्या विरोधात सीईओंच्याकडे तक्रारी adjustकेआयटी रेडी इंजिनियरमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल adjustप्रा.ऋतुराज कुळदीप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन adjustख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मनोरंजननगरी, माशांच्या नानाविध जाती ! adjustडीवाय पाटील फार्मसीत जी पॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन adjustआचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक ! शिक्षक संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट adjustजिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली ! फायलींचा प्रवास-दिरंगाई समोर येणार !!
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule02 May 24 person by visibility 286 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ’सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष नीच पातळीचे राजकारण करत आहे. घराणे फोडायची, कुटुंबे तोडायची. भ्रष्ट नेत्यांना मानाची पदे देत आहेत. बलात्कार करणाऱ्यांना मिठ्या मारत आहेत. राज्याच्या हक्काचा, तोंडचा घसा गुजरातला पळवत आहेत. महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी ? खरं तर, महाराष्ट्राची परंपरा, ‘शूरा मी वंदिले’ची आहे. आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाची परंपरा ’चोरा मी वंदिले’अशी आहे. महाराष्ट्राला ओरबडणाऱ्या भाजपाचा सुफडासाफ करणार. हे राज्य महाराष्ट्रद्रोह्यांच्या हाती जाऊ देणार नाही.’असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढविला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ एक मे, महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून जाहीर सभेचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, युवराज संभाजीराजे छत्रपती, आपचे दिल्लीतील खासदार संजयसिंह, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते संजय पवार,  सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये सभा झाली. शिवाजी पेठ येथील गांधी मैदान येथे झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण मैदान नागरिकांनी तुडूंब भरले होते. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते पवार यांच्या भाषणांनी संपूर्ण मैदान महाविकास आघाडी व शाहू छत्रपतींच्या विजयाच्या घोषणांनी दुमदुमले. या सभेत ज्यांनी गद्दारी केली, त्यांचा सूड घेणारच असा असा दमही ठाकरे यांनी भरला.
रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाले. उपस्थिन नागरिकांना अभिवादन केले. नागरिकांशी थेट संवाद साधताना म्हणाले ‘एक मे हा महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा दिला, त्याची यशोगाथा सांगणारा हा दिवस. मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकातील शेतकरी, कामगारांच्या हाती जी मशाल आहे तीच मशाल घेऊन पुढे जाणार आहोत. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही बलिदानातून, त्यागातून, संघर्षातून झाली आहे. रक्त सांडून मिळवेली मुंबई महाराष्ट्रद्रोह्यांच्या हाती जाऊ देणार नाही.’असे ठाकरे यांनी भाजपाला ठणकावताच उपस्थितांतून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोष घुमला.
‘महाराष्ट् हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू्-फुले- आंबेडकर यांचा आहे की मोदी-शहा यांचा ? हा महाराष्ट्र शिवशाहू-फुले-आंबेडकर यांचा म्हणून टिकवणार की अदानी-अंबानीच्या हातात देणार ? असा थेट सवाल त्यांनी करताच सभेचा नूर पालटला. उपस्थित नागरिकांनी हात उंचावत हा महाराष्ट्र मोदी आणि शहांच्या हाती देणार नाही याची खात्री दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सूरत लुटली आता सूरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्राची लूट होत असताना डोळयावर झापड घालून गप्प बसणार नाही असा गर्भित इशाराही ठाकरे यांनी दिला.
‘मोदी सरकार हे गझनी सरकार आहे. त्यांना मागील काही आठवत नाही. प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा. केवळ जुमलेबाजी सुरू आहे. महागाईवर अवाक्षर बोलत नाहीत. तरुणांना रोजगार नाही. नोकरीचा पत्ता नाही. निव्वळ फसवाफसवी. मोदी गायीवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत. शेतकऱ्यांनी सरकारचे काय घोडे मारले आहे? शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत प्रत्येक मालावर जीएसटी. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. किसान सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची अवहेलना सुरू आहे. बळीराजा हा काही भिकारी नाही. मोदी चाय पे चर्चा करतात, मग विकासाच्या मुद्यावर जनतेसमोर खुली चर्चा करा, मी तयार आहे.’ असे आव्हान ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले ‘लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. शेतीशी निगडीत सगळया वस्तूवरील जीएसटी रद्द करु. कराच्या आडून व्यापाऱ्यांचाही त्यांनी छळवाद मांडला आहे. भाजपा सरकारचा कर दहशतवाद थांबवू.’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानांनी देशाच्या उभारणीसंबंधी, राज्याच्या विकासासंबंधी, गरीबी हटावच्या धोरणाविषयी विचार मांडायचे असतात. मात्र नरेंद्र मोदी अशा विकासात्मक बाबीवर काही बोलत नाहीत. महाराष्ट्रात फिरतात, मात्र प्रत्येक सभेत माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीने कधी प्रचार केला नव्हता. मोदींनी महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे, जनतेकडे दुर्लक्ष केले. येथील जनता त्यांना महाराष्ट्राचा हिसका दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही.’
…………………………
मोदी वखवखलेला आत्मा, वाजपेयींचा आत्मा रडत असेल
शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा अशी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वासंबंधी व आपत्कालिन व्यवस्थापन कार्याबद्दल केलेल्या कौतुकाची आठवण करुन देत ठाकरे म्हणाले, ‘गुजरातमधील भूकंपावेळी शरद पवार यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्या राज्याला मदत केली होती. राजकारणात मतभेद असला तरी दिलदारपणा जपायचा असतो. वाजपेयी, पवार यांनी प्रत्यक्ष आचरणातून, सहकार्याच्या कृतीतून दाखवून दिला. आता मोदींचा कारभार, हीन दर्जाची वक्तव्ये पाहून अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा रडत असेल. कोणाच्या हातात भाजपा गेला या भावनेने त्यांना दु:ख होत असेल. मोदी म्हणजे सत्तेसाठी वखवखलेला आत्मा आहे.’
……………………………
छत्रपतींच्यासोबत मोदींची तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही
‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करायचा भाजपाने प्रयत्न केल्यास महाराष्ट्र तो सहन करणार नाही. मोदींच्या बगलबच्च्यांनी, त्यांच्या घरी जरुर मोदींचा उदोउदो करावा. पण छत्रपतीसोबत तुलना नको. महाराष्ट्राच्या मुळावर उठला तर स्वस्थ बसणार नाही. भाजपा म्हणजे इतर पक्षातील नेते पळविणारी टोळी. राजकारणात नेते म्हणून तुम्हाला मुले होत नाहीत. त्याला आम्ही काय करणार ? ते तुमचं अपयश आहे. म्हणून गद्दारांना फूस लावत, चोरुन उभे करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष चोरले, गद्दारांच्या हाती चिन्हे दिली. आता हे दोन्ही पक्ष संपले, महाराष्ट्र आमच्या बापाचा झाला असे मोदी-शहा यांना वाटत असेल तर तसे अजिबात नाही. करोडो लोक आमच्यासोबत आहेत. ही लढाई आम्हीच जिंकणार. महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना तडीपार करू’असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
……………….
संभाजीराजेंची माफी….
‘अडीच वर्षापूर्वी झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या निवडणुकीत युवराज संभाजीराजे यांची शिवसेनेने अवहेलना केल्याचे काही जण म्हणत आहेत. मात्र त्या निवडणुकीत काही उलटसुलट झालं तर असते तर संभाजीराजेंच्या पराभवाचं पाप कोणाच्या माथी आलं असते ? उमेदवारीवरुन काही झालं असेल तर, युवराज संभाजीराजे यांची मी जाहीर माफी मागतो. त्यानंतरही त्यांची आणि आमची मैत्री तुटली नाही.ऋणानुबंध कायम आहेत. संभाजीराजेंवरुन आमच्याकडे अंगुलीनिर्देश करणारे,आता शाहू छत्रपतींना का बिनविरोध निवडून दिले नाहीत. त्यांना लढायला का भाग पाडला ?’असा सवाल महायुतीला केला.
 ……………………………….
मुश्रीफ कुठे आहेत…
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकली. ईडीच्या धाडसत्रामुळे त्रस्त झालेल्या त्यांच्या पत्नीने, ‘चौकशीचे असे शुल्ककाष्ठ मागे लावून बदनामी करण्यापेक्षा एकदाच गोळया घाला.’अशा धायमोकलून सांगत होत्या. आता मुश्रीफ कोठे आहेत ? आरोप करणारे गप्प आहेत.
……………….
मोबाइल टॉर्चने उजळले गांधी मैदान
सभेला प्रचंड गर्दी होती. गर्दीकडे पाहत ठाकरे म्हणाले, कोल्हापूरकरांचे काय ठरले आहे ? गेल्या लोकसभेला आम्ही भाजपला पाठिंबा दिला. आणि विधानसभेला भाजपाने शिवसेनेशी बेईमानी केली. विधानसभेला शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना गाडायचे आहे. कोल्हापुरात गुळगुळीत चालत नाही. भाजपवाल्यांना कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा झटका द्या. आता लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना निवडून देऊ. महाराजांना निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मोबाइल टॉर्च चालू करा असे आवाहन ठाकरे यांनी करताच साऱ्यांनी उभे राहून मोबाइल टॉर्च केला. सारे गांधी मैदान उजळून निघाले.