
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची १३१ वी जयंती साजरी झाली. शिवाजी पेठेतील पद्माराजे गार्डन येथे सकाळी दहा वाजता महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते व महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संचालक रणजीत जाधव, सतीश बीडकर, मिलिंद अष्टेकर, अरुण चोपदार, राहूल राजशेखर, अनिल काशीकर, महादेव साळोखे, सुनील मुसळे, प्रकाश गवळी, राजू पाटील, सदाशिव पाटील, दिलीप काटे, बबन बिरंजे, अरुण शिंदे, मधुकर वाघ, अमर मठपती महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर उपस्थित होते.
याप्रसंगी अनेकांनी, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या सिनेमाविषयी बोलले. ‘कला आणि तंत्राची उत्तम ज्ञान असणारे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री, भक्त प्रल्हाद, नेताजी पालकर’असे सिनेमे केले. त्यांनी देशातील सामाजिक आशयावर आधारित ‘सावकारी पाश’हा सिनेमा काढला. चित्रपटांचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबूराव पेंटर हे एकमेव होते. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये त्यांनी भारतीय सिनेमाला दिली. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच.एम.रेड्डी,नागी रेड्डी व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, फत्तेलाल, धायबर, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, नानासाहेब सरपोतदार यांच्यासारखी मंडळी तयार झाली.’अशा शब्दांत मान्यवरांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या सिनेकार्याची थोरवी सांगितली.