पन्नास हजाराच्या लाचप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक ताब्यात, गांधीनगरातील प्रकार
schedule19 Dec 24 person by visibility 176 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनावरांची अवैध वाहतूक करणारी मोटार सोडविण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाच मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर येथील तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी (१९ डिसेंबर) दुपारी ही कारवाई केली.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काही दिवसापूर्वीच सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांच्याकडून गांधीनगर पोलिस ठाणे येथील सहायक पोलिस निरीक्षकचा पदभार काढून घेतला होता. तसेच पोलिस नियंत्रण कक्ष येथे बदली केली होती. जाधव हे गांधीनगर येथे सहायक पोलिस निरीक्षक असताना जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी मोटार जप्त केली होती. त्या गुन्हयात जप्त केलेली मोटार परत मिळावी यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या चकरा मारत होते. पकडलेली मोटार परत करण्यासाठी जाधव यांनी संबंधितांकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितली होती.
लाच मागितल्याचे निष्ण झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. त्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांच्या विरोधातही गुन्हा नोंद आहे. सहायक पोलिस निरीक्षक जाधव व काँन्स्टेबल कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.