कोल्हापुरात एक हजार कोटीचे ११०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल, सरकारकडून प्रशासकीय मान्यता ! अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन
schedule30 Nov 23 person by visibility 903 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात शेंडापार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होणार आहे. दरम्यान; छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच सीपीआरमध्ये अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी ४४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शेंडा पार्क येथे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे. शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत. तसेच; हॉस्पिटलमधील सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल -दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. इमारतींची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा- सुविधा आणि परिसर सुधारणांसह या कामांवर एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत.*
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पाच इमारती ५८ कोटी निधीच्या खर्चातून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
..............................................
असे होणार हॉस्पिटल......
एकूण ३० एकरांत अकराशे बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल /आरोग्य संकुल. □न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत.निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०. निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०. □मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०. मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०. परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३०. सेंट्रल लायब्ररी. परीक्षा भवन- क्षमता ४००
□अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण
==============