सर्व स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळावा; राज्यस्तरीय समन्वय प्राधिकरण स्थापण्याची मागणी
schedule19 Jul 26 person by visibility 121 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्रातील पात्र स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक विकास प्रकल्पांना कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी पारदर्शक व समान संधीच्या तत्त्वावर उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यस्तरीय "महाराष्ट्र राज्य सीएसआर समन्वय व सुविधा प्राधिकरण" स्थापन करण्याची मागणी पुढे आली आहे. महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांच्या माध्यमातून हा विषय राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. डॉ. युवराज येडूरे यांनी सांगितले, ‘अनेक पात्र स्वयंसेवी संस्था शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, कृषी, ग्रामीण विकास आणि इतर सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, माहितीचा अभाव, तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता आणि कंपन्यांशी थेट समन्वय नसल्यामुळे अनेक संस्थांना सीएसआर निधी मिळत नाही. यासाठी सरकारने स्वतंत्र सीएसआर समन्वय प्राधिकरण, प्रत्येक जिल्ह्यात सीएसआर समन्वय कक्ष असावा. या उपक्रमामुळे राज्यातील पात्र स्वयंसेवी संस्थांना समान संधी मिळेल। निधीचा पारदर्शक वापर वाढेल आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, पिण्याचे पाणी, ग्रामीण विकास, पानंद रस्ते, महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांतील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.