इचलकरंजीत तीन दिवसीय शाहिरी महोत्सव
schedule18 Mar 24 person by visibility 223 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे इचलकरंजी येथे २० ते २२ मार्च २्०२४ या कालावधीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे महोत्सव होणार आहे.
या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांची आहे. शाहिरी व संगीतावर आधारित सांस्कृतिक महोत्सव आहे. रोज सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात २० मार्च रोजी युवा शाहिरा क्रांती व कीर्ती जगताप यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सुप्रसिध्द शाहीर अनंतकुमार साळुंखे सांगली, श्रीमती निशिगंधा साळुंखे लातूर व खानदेशातील सुप्रसिध्द शाहीर तथा राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील यांचे सादरीकरण होईल.
महोत्सवाच्या व्दितीय पुष्पात २१ मार्च रोजी सुप्रसिध्द युवा शाहीर अजिंक्य लिंगायत, सुप्रसिध्द शाहिरा कल्पना माळी तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त शाहीर अवधूत विभुते यांचे देखील सादरीकरण होईल. या महोत्सवात २२ मार्च, रोजी युवाशाहीर अमोल रणदिवे यांचे सादरीकरण आहे. त्यानंतर, शाहीरा भक्ती मालुरे यांचे सादरीकरण होईल तर या महोत्सवाची सांगता ज्येष्ठ शाहीर शामराव खडके यांच्या पोवाड्याने होईल. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.