बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटक
schedule01 Jul 26 person by visibility 406 categoryगुन्हे
शाहूवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे यांना ३८ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.वनमोरे हे मूळचे कोयना वसाहत कराड येथील आहेत. एक जुलै २०२६ रोजी कारवाई झाली. शाहूवाडी तालुक्यातील कर्नाळवाडी ते सोनारवाडी विरळे हद्दीपर्यंतचे दोन किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण व शिराळे वारुन पुलाचे कामाचे बिल मंजूर केले म्हणून वनमोरे यांनी ठेकेदाराकडून ३४ हजार ७०० रुपयांची लाच मागितली होती.यासंबंधी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी खातरजमा करुन सापळा लावला. शाखा अभियंता वनमोरे व ठेकेदारात पुन्हा चर्चा झाली. यावेळी वनमोरे यांनी, शिराळे वारुनच्या पुलाचे काम, कर्नाळवाडी ते सोनारवाडी गावातील कामासाठी ३८ हजार रुपये घेऊन येण्यास ठेकेदारास सांगितले. पोलिसांनी, बुधवारी वनमोरे यांना लाच घेताना पकडले. त्यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलिस हेड काँन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने कारवाई केली.