शिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवड
schedule17 Jun 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान अधिविभाग) यांनी सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. स्कूलमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे. स्कूलचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी ही माहिती दिली.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत आहेत. अधिविभागातील आधुनिक तंत्रज्ञान आधारित आणि उद्योगाभिमुख शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी मिळत आहेत. तसेच अभ्यासक्रम कौशल्यविकास, संशोधन आणि गुणवत्ता यांवर आधारित असल्याने अधिविभागातील विद्यार्थी सक्षम अभियंते म्हणून घडत आहेत. स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या प्लेसमेंट सेलचे वैशिष्ट्य म्हणजे सलग दोन वर्षे इन्फोसिसचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी या ड्राईव्हमधून १७५ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड झाली असून, स्कूलने पुन्हा एकदा उत्कृष्ट समन्वय व नेतृत्व सिद्ध केले आहे.
विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल आणि अधिविभागाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दरवर्षी कॅम्पस ड्राईव्हमध्ये अनेक नामवंत कंपन्या सहभाग दर्शवित आहेत. स्कूलच्या विदयार्थ्यांची साधारणपणे वर्षाला ३ ते ९ लाखांपर्यंतची पॅकेजिस देऊन निवड केलेली आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी मिळाव्यात आणि अधिविभाग संशोधन केंद्र म्हणून विकसित व्हावा यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि अधिविभाग संशोधनात प्रगत व्हावा यासाठी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे, शामल पवार, स्कूलच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. गणेश पाटील, त्यांचे सहकारी, तसेच सर्व शाखांचे समन्वयक आणि प्राध्यापक सतत कार्यरत आहेत.