संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन
schedule01 Jan 26 person by visibility 24 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही अडचणी असोत की महापुराचे संकट…प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी मदतीला धावून जाणारी व्यक्ती प्रकाश नाईकनवरे. शाहूपुरी भागात ते अनेकांचे आधारवड. दातृत्वाचा गुण असल्यामुळे त्यांच्याकडे कधी कोण मदतीसाठी गेला तर रिकाम्या हाताने परत जात नाही. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना विकासावर फोकस ठेवणारा नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. २००५ पासून त्यांच्या कुटुंबीयांत नगरसेवकपद आहे. यावरुन नाईकनवरे कुटुंबीय आणि भागातील जनतेमधील विश्वासाच्या घट्ट नात्याचे दर्शन घडते.
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रकाश नाईकनवरे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्रमांक चौदामध्ये सर्वसाधारण गटातून त्यांची उमेदवारी आहे. नाईकनवरे कुटुंबीयातील सदस्य नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावणारे. सामाजिक कार्यात आघाडीवर राहणारे. २००५ मध्ये कोल्हापूरला महापुराचा फटका बसला. शाहूपुरीच्या विविध भागात पाणी शिरले. असंख्य लोक स्थलांतरित झाले. या पूरग्रस्त लोकांसाठी नाईकनवरे यांनी अन्नछत्र सुरू केले. जवळपास तीन आठवडे हे अन्नछत्र सुरू होते. या अन्नछत्राचा लाभ रोज हजारो लोकांना झाला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २००५ मध्ये पहिल्यांदा प्रकाश नाईकनवरे यांनी निवडणूक लढविली. लोकांच्या पाठिंब्यावर नगरसेवक झाले.
त्यांची आतापर्यंतची वाटचाल ही संघर्षपूर्ण. अगदी शून्यातूनही त्यांनी सुरुवात केली. उमेदीच्या काळात केएमटीत नोकरी, पुढे बांधकाम व्यवसायात प्रवेश, कोल्हापुरातील विविध प्रोजेक्टवर काम, नगरसेवक असा त्यांचा चढता आलेख आहे. २०१० मध्ये ते व त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे हे दोघे निवडून आले. प्रतिभा नाईकनवरे या महापौर झाल्या. महापौरपदाच्या कालावधीत विकास योजनांना गती दिली. नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू समाधीस्थळ विकसित व्हावे म्हणून प्रतिभा नाईकनवरे यांच्या महापौरपदाच्या कालाावधीत पाठपुरावा केला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुशोभिकरणाचा शुभारंभही त्यांच्या महापौरपदाच्या कालावधीत झाला. खासगीकरणाच्या माध्यमातून चार ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली. प्रभागात स्वातंत्र्यदिनी घरोघरी जिलेबी वाटपाचा उपक्रम राबविला. लेक लाडकी अभियानला चालना दिली. प्रभागात एखाद्या कुटुंबात मुलगी झाली तर तिच्या नावांनी दोन हजार रुपयांची ठेव योजना सुरू केली.
प्रकाश नाईकनवरे यांनी पुढाकार घेऊन विविध कामे प्रभागात साकारली. भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. ७५ लाख रुपये खर्चून पंत बाळेकुंद्री मार्केट उभारले. भागातील नागरिकांची घरे कुठे आहेत हे समजण्यासाठी चौकाचौकात फलक उभारले. स्वच्छ व सुंदर प्रभाग ही संकल्पना राबविली. समाजकारण व राजकारण करताना प्रभागातील लोकांशी जुळलेली नाळ कायम ठेवली. यामुळे २०१५ मधील महापालिका निवडणुकीत त्यांच्या स्नुषा पूजा या निवडून आल्या. त्यांनीही महापालिकेत काम करताना अभ्यासू नगरसेविका म्हणून छाप पाडली. आता होत असलेल्या निवडणुकीत प्रकाश नाईकनवरे उमेदवार आहेत. मतदारसंघातील चारही प्रभागात त्यांचा संपर्क आहे. मतदारांशी संपर्क साधत आहेत.