शहीद महाविद्यालयात ग्लोबल कोल्हापुरी संवाद : अमेरिकेत कार्यरत युवा आयटी तंत्रज्ञांची अनोखी मैफल
schedule31 Dec 25 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जागतिक स्तरावर करिअरसाठी उपलब्ध संधी, त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य आणि परदेशातील रोजगार प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्लोबल कोल्हापुरी संवाद हे विशेष चर्चासत्र शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थिनींना अडोबी , अमेझॉन वेब सर्विसेस आणि कोर्सियर या अमेरिकेतील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या युवा आयटी तंत्रज्ञाकडून आंतरराष्ट्रीय अनुभवाची जवळून ओळख करून देण्यात आली. सॉफ्टवेअर इंजिनिअर ऋतुजा हसुरकर, सॉफ्टवेअर इंजिनिअर शिवम हसुरकर आणि मॅनेजर प्रतीक देशमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या ग्लोबल कोल्हापुरी संवादाचे संयोजन आणि अध्यक्षस्थान आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी भूषवले.
विद्यार्थ्यांनी ग्लोबल इंडस्ट्रीमध्ये करिअर करताना कोणती तयारी आवश्यक आहे, डिजिटल कौशल्यांची वाढ, परदेशातील शिक्षण व शिष्यवृत्तीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर माहिती दिली.आंतरराष्ट्रीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांनी संवाद साधला. ग्लोबल मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
‘ कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअर करता यावे यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी कार्यरत राहील, विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर नाव कमवण्या बरोबरच आपल्या देशासाठी आणि कोल्हापूरसाठी ग्लोबल कोल्हापुरी म्हणून काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे ’ असे मत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी रवींद्र हसुरकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक म्हणून प्रा.सागर शेटगे यांनी भूमिका पार पाडली. यावेळी प्रा.विशालसिंह कांबळे, दिग्विजय कुंभार, सरिता धनवडे उपस्थित होते.