मोठं ध्येय ठेवा, जोखीम घ्या आणि शिस्त पाळा : यतीन शाह
schedule22 Oct 26 person by visibility 5 category
‘स्मॅक’च्या ५१ व्या वार्षिक सभेत प्रिसिजन कॅमशाफ्ट्सच्या यशाचा उलगडा : सहा युवा उद्योजकांचा गौरव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :*उद्योगात यश मिळविण्यासाठी मोठे ध्येय, जोखीम घेण्याची तयारी, जिद्द आणि आर्थिक शिस्त आवश्यक असल्याचे प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, सोलापूरचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतीन सुभाष शाह यांनी सांगितले.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅक ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले होते. कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये ही सभा झाली.
प्रमुख पाहुणे शाह यांच्या प्रकट मुलाखतीतून प्रिसिजन समूहाच्या यशस्वी उद्योगप्रवासातील अनुभव, व्यावसायिक निर्णय, आर्थिक शिस्त, जोखीम घेण्याची तयारी आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा उलगडा झाला. कोल्हापूरच्या उद्योजकांमधील एकजुटीचे कौतुक करताना शाह म्हणाले, “तुमच्यातली एकता मला फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. उद्योग एकत्र येतो आणि प्रत्यक्षात काही करतो, हे फार कमी ठिकाणी दिसते. तुमच्यातलं स्पिरिट मला फार कमी वेळा भेटतं. तुम्ही खूप पुढे गेले आहात.
“मोठं ध्येय ठेवलं नाही, तर तुम्ही मोठी कामगिरी करू शकत नाही. मोठ्या आव्हानाला कधीही नाही म्हणू नका. निदान, ते घडण्यापूर्वी आपलं सर्वोत्तम द्या.” मेंटरकडून जोखीम घेण्याची शिकवण मिळाल्याचे सांगत त्यांनी, “जोखीम घ्या. तिथेच मी सुरुवात केली,” असे स्पष्ट केले. उद्योग चालविताना उत्पादन आणि उलाढालीबरोबरच नफाक्षमता व आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे शाह यांनी सांगितले. “उद्योग चालवायचा असेल तर फायनान्सचं ज्ञान तितकंच, किंबहुना जास्त गरजेचं आहे. बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे. फायनान्स हा कोणत्याही उद्योगाचा कणा आहे,” असे ते म्हणाले. प्रिसिजन समूह कर्जमुक्त असल्याचे सांगून गेल्या ३५ ते ४० वर्षांत एकदाही सल्लागार नेमला नसल्याचे आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच सर्वोत्तम कामगिरी करून दाखविल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रिसिजनच्या उद्योगप्रवासातील संघर्षाविषयी बोलताना शाह यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मान्यता मिळविण्यासाठी लागलेल्या प्रदीर्घ कालावधीचा उल्लेख केला. टोयोटाची मान्यता मिळविण्यासाठी तीन वर्षे आणि १३ ऑडिट्सना सामोरे जावे लागले, तर मारुतीची मान्यता मिळविण्यासाठी १५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. “कन्व्हिक्शन पाहिजे, जिद्द पाहिजे,” असे सांगत त्यांनी सातत्य आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रिसिजन समूह महिन्याला सुमारे १० लाख कॅमशाफ्ट तयार करतो, मात्र जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही क्षमता केवळ नऊ टक्के असल्याने वाढीस मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले. मारुतीला वर्षाला सुमारे तीन लाख कॅमशाफ्टचा पुरवठा केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपनीतील पारदर्शकतेविषयी बोलताना, “आमच्या कारखान्यात कोणीही, कुठेही जाऊ शकतो. गेली ३२ वर्षे मी माहिती शेअर करतोय; काही वाईट घडलेलं नाही. ही पारदर्शकता आमचं हॉलमार्क आहे,” असे ते म्हणाले.
इंटर्नल कम्बशन इंजिनचे भविष्य संपणार असल्याची चर्चा सुरू असतानाही प्रिसिजनने इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) क्षेत्रात प्रवेश केल्याचे शाह यांनी सांगितले. नेदरलँड्समधील कंपनीचे अधिग्रहण केले, तेव्हा तिची उलाढाल ३० लाख युरो होती. चार वर्षांत ती वाढवून २.५ कोटी युरोंपर्यंत नेल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशातील व्यवसायविस्ताराविषयी बोलताना त्यांनी पाश्चिमात्य देशांत अधिग्रहण करण्याबाबत सावधगिरीचा सल्ला दिला. “पर्यटक म्हणून युरोप सुंदर दिसतो; पण व्यवसाय करायला अत्यंत कठीण आहे,” असे ते म्हणाले.
तरुण पिढीला मार्गदर्शन करताना शाह यांनी वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कौशल्य, अनुभव आणि आर्थिक स्थैर्य मिळविण्याचे महत्त्व सांगितले. “जेन-झीसाठी चार-पाच वर्षांची खिडकी असते. वयाच्या ३१-३२ पर्यंत स्थिर झाला नाहीत, तर हरवलात. स्थैर्य लवकर यावं लागतं,” असे ते म्हणाले. उद्योजकांनी मोठी आव्हाने स्वीकारावीत, सतत शिकत राहावे आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजाला योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वयाच्या पन्नाशीनंतर जीवनशैलीत बदल करून १२ किलो वजन कमी केल्याचा अनुभव सांगत त्यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “फिट राहणं सर्वात महत्त्वाचं,” असा सल्लाही त्यांनी दिला.
कोविडच्या कठीण काळात सुमारे ७०० कामगारांना कंपनीतच ठेवून त्यांची काळजी घेतल्याचे सांगताना शाह म्हणाले, “कुटुंबासारखं सांभाळणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे.” उद्योगातील यश हे केवळ कंपनीच्या वाढीत नसून कर्मचारी, समाज आणि परिसराच्या विकासातील योगदानातही असते, अशी भूमिका त्यांनी मांडली. सोलापूर शहराने आपल्याला खूप काही दिले असून समाजाला परत देणे आवश्यक असल्याचे सांगत, “आम्ही युनिक नाही. इथले सगळेच उद्योजक समाजाला काहीतरी परत देतात,” असे त्यांनी नमूद केले.
पहिल्या सत्रात स्मॅक ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्ष जयदीप चौगले स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल वाचन स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष प्रशांत शेळके, स्मॅक क्लस्टरचे चेअरमन सुरेश चौगुले, स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन आय. ए. पाटील यांनी केले. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन मॅनेजर यांनी केले. ऑन. सेक्रेटरी रणजीत जाधव यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात इकोमार्क सिस्टिम्स प्रा. लि., पुणे, इनोव्हिस्टा ऑटोमेशन, कोल्हापूर आणि ॲक्युरेट सेल्स अँड सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे यांनी प्रेझेंटेशन केले.
प्रमुख पाहुणे यतीन शाह, अध्यक्ष जयदीप चौगुले, उपाध्यक्ष भरत जाधव, ऑन. सेक्रेटरी रणजीत जाधव आणि खजिनदार बदाम पाटील यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक व मनोगत मांडले. वर्षभरातील संस्थेच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी वीज क्षेत्रातील पॉवर बँकिंग धोरणाविरोधात APTELमध्ये कायदेशीर लढा देऊन अंतरिम दिलासा मिळविल्याची माहिती दिली. संस्थेच्या रक्तदान उपक्रमात ३,१२१ रक्तपिशव्यांचे उच्चांकी संकलन झाले. सेवा दवाखान्याचा विस्तार करण्यात आला असून पाच डॉक्टर रविवारसह दररोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सेवा देत आहेत, असे त्यांनी सांगितले. शिरोली एमआयडीसीतील पायाभूत सुविधा, औद्योगिक सुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था, गॅस टंचाई, कच्च्या मालाची उपलब्धता आणि कचरा डेपो यांसारख्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. स्मॅक भवनात नवीन ऑडिटोरियम उभारण्यात येत असून मालमत्ता कराविरुद्ध कायदेशीर लढ्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उपाध्यक्ष भरत जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शाह यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्रासह जारी केलेल्या टपाल तिकिटाची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे यतीन शाह यांच्या जीवनप्रवासावर आधारित आणि त्यांच्या निवडक मुलाखतींमधील विचारांचा समावेश असलेल्या ‘उद्योगश्वास’ या १२४ पानी पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, यतीन शाह यांच्या हस्ते स्मॅकच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
यतीन शाह यांच्या हस्ते शिरोली औद्योगिक क्षेत्रातील सहा युवा उद्योजकांना ‘युवा उद्योगरत्न’ सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये श्रीमती स्मिता योगेश घोरपडे (भाग्यश्री एंटरप्रायझेस), साक्षी विजय जाधव (विश्वकर्मा फाउंडर्स इंडिया प्रा. लि.), किरित बिडकर (प्रिसाइज कॉम्पोनंट्स), प्रतीक संजय दुधाळ (क्वालिटी टूल्स अँड इक्विपमेंट्स), पार्थ राजुल लायनेसवाला (राजुर्वी इंजिनिअर्स) आणि आदर्श नामदेव जाधव (रमाई इंजिनिअर्स) यांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात यतीन शाह यांनी स्मॅक भवन, स्मॅक आयटीआय आणि स्मॅक क्लस्टरला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. खजिनदार बदाम पाटील यांनी आभार मानले.शाह यांची प्रकट मुलाखत स्वप्नील पन्हाळकर यांनी घेतली.खजिनदार बदाम पाटील यांनी आभार मानले. यावेळी स्मॅकचे संचालक सुरेंद्र जैन, राजू पाटील, अतुल पाटील, नीरज झंवर, शेखर कुसाळे, स्वीकृत संचालक एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, गोशिमाचे अध्यक्ष संजय देशिंगे, उपाध्यक्ष अमोल जाधव, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, उद्यम सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, सीआयआयचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, स्मॅकचे माजी अध्यक्ष आर. बी. थोरात, डी. एस. लडगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे शिवराज नाईकवाडी, उद्योजक सचिन शिरगावकर, दीपक जाधव, प्रताप पुराणिक, अमोल पाटील, रामराजे बदाले उपस्थित होते.