Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणागोकुळची निवडणूक हलक्यात घेऊ नका…! – शौमिका महाडिकांचे तडाखेबंद भाषणगोकुळच्या निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल, विरोधकांचा एकही संचालक निवडून येणार नाही-धनंजय महाडिकणण छअनेक दिवसांचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर…आयटी पार्कसाठी शेंडापार्कमध्ये ३४ हेक्टर जागा मंजूरशहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभअर्जुनवाडा येथे रंगणार सुपर मॉम स्पर्धा

जाहिरात

 

महायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!

schedule07 Mar 26 person by visibility 26 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढायचे हे निश्चित झाले. नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब केले. महायुती म्हणून भारयीत जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, राजर्षी शाहू आघाडी हे सारे एकत्र असले तरी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील शह काटशहाच्या राजकारण गाजले. सोयीच्या राजकारणाचे फटाके अजूनही वाजत आहेत. जय पराजयाचा हिशेब मांडताना जिल्हा परिषद व महापालिकेत पदावरुन एकमेकांना ब्रेक लावण्याची खेळी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर  गोकुळच्या निवडणकुीत नेतृत्व कोणाकडे ? हा कळीचा विषय आहे. भाजप नेतृत्व करणार की मंत्री मुश्रीफ आपली पकड कायम ठेवणार? हे अजून तरी अनुत्तरीत आहे. जिल्ह्यातील राजकारणात मुश्रीफ यांची भूमिका वादग्रस्त ठरत असून महायुतीतील अन्य पक्ष त्यांना कोंडीत पकडत आहेत.

भारतीय जनता पक्ष मोठा भावाच्या भूमिकेत स्वत:ला पाहत आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ हे गेली पाच वर्षे गोकुळमध्ये सत्तेत आहेत.  यामुळे ते उमेदवारीचा निकष ठरावाच्या संख्येवर मांडत आहेत. गेली पाच वर्षे गोकुळचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती आहे. या कालावधीत सत्ताधाऱ्यांनी दोन हजाराच्या आसपास प्राथमिक दूध संस्था वाढविल्या आहेत. या साऱ्या संस्था पात्र ठरल्या तर जय - पराजयात त्यांचा कौल निर्णायक ठरणार आहे. मागील सत्तांतरावेळी दोन्ही काँग्रेसच्या बरोबरीने असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे, शिवसेनेचे नेते व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके हे सध्या महायुतीचे घटक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून तर कोरे यांनी राष्ट्रवादी विशेषता मुश्रीफ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते भाजप सोबत असणार हे निश्चित आहे. मंत्री मुश्रीफ हे महायुतीत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांनी प्रत्येक तालुक्यात केलेल्या आघाडया आता महायुतीतील अन्य नेतेमंडळींना त्रासदायक ठरत आहेत. त्यांनी केलेल्या राजकीय आघाडया, सोयीच्या राजकारणावर आता उघडपणे टीका होऊ लागली आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजीला वाट करुन दिली. भाजपाने स्तवंत्र पॅनेल करावे. मुश्रीफ यांना वगळून पॅनेलची उभारणी करावी. सत्ता काळात त्यांनी ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची अडवणूक केली आहे अशी रोखठोक मते मांडली. महायुती म्हणून निवडणूक लढवणार असाल तर भाजपाने नेतृत्व करावे. असा आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेत भाजपच्या नेत्यांनी, ‘गोकुळच्या निवडणुकीत कोणाच्या दबावाला बळी पडू नका. साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच अवलंब करा. गोकुळची निवडणूक जिंकायची आहे.’अशा शब्दांत आश्वस्त केले. खासदार महाडिक यांनी ‘गोकुळ दूध संघाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुती म्हणून एकत्र लढविली जाईल.’अशी घोषणा केली.

गोकुळ दूध संघातील राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात, जिल्हा परिषदेतील यश आणि ठरावधारकांची संख्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली लढणार का ? हा प्रश्न आहे. मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या वर्षभरापासूनच गोकुळच्या निवडणुकची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बदलत्या राजकीय स्थिती ओळखून गोकुळसाठी स्वतंत्रपणे यंत्रणा कार्यरत केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेली पाच वर्षे गोकुळमध्ये सत्तेत असल्यामुळे त्यांनी यंत्रणा गतीमान केली आहे. राष्ट्रवादी अर्थात मंत्री मुश्रीफ हे गोकुळमधील आपली पकड ढिली होऊ देणार नाहीत. ठराव संख्येच्या आधारे गोकुळचे नेतृत्व आपल्याकडेच राहील यापद्धतीने त्यांची रणनिती असणार आहे. आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीत शिवसेना आणि जनसुराज्य हे दोन्ही महत्वाचे भाजपसोबत आहेत. प्रकाश आबिटकर, कोरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून संजय मंडलिक व मुश्रीफ यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत तर दोघे कट्टर शत्रू असल्यासारखे आमनेसामने उभे ठाकले. कागलच्या राजकारणातून मंडलिक हे मुश्रीफ यांचे नेतृत्व मान्य करतील अशी सध्या स्थिती नाही. स्थानिक राजकारणात आबिटकर आणि के. पी. पाटील, चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे विरोधक आहेत. आता गोकुळसाठी महायुती म्हणून एका व्यासपीठावर बसावे लागणार आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागलमध्येही स्थानिक राजकारणाची गत अशीच आहे. या साऱ्यांना सोबत घेऊन गोकुळच्या निवडणुकीचे आव्हान नेतृत्वाला पेलावे लागणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes