जे सगळयांच्या मनात ते निश्चित पूर्ण होईल, राहुल पाटलांना विधीमंडळात संधी द्यायचीय-अजित पवार
schedule26 Aug 25 person by visibility 61 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून राहुल पाटील यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांना आता विधीमंडळात संधी द्यायची आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ऋणानुबंध सगळयांनी अनुभवले. भविष्यात राहुल पाटील आणि माझ्यातील नाते म्हणजे सडोली ते काटेवाडीचे नाते राज्याला पाहावयास मिळेल’अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी आपल्या गटासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सडोली खालसा येथे येथील पक्षप्रवेशाच्या सोहळयाला नागरिकांती प्रचंड गर्दी केली.
याप्रसंगी अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाजघटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची पक्षात आवश्यकता आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या राजकीय तालमीत घडलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे.राहुल व राजेश पाटील यांनी ज्या विश्वासाने राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तुमच्या साऱ्यांच्या मनात जे आहे ते येत्या कालावधीत पूर्ण होईल.’
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दिवंगत आमदार पी. अन. पाटील गटाचे मुख्य नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाला सशक्त केले. पारंपरिक निष्ठा, सामाजिक सेवा आणि कार्यकर्त्यांशी असलेला संबंध हा गट पक्षासाठी खूप उपयोगी ठरेल. सर्वांना योग्य स्थान प्रदान केले जाईल.’
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी ‘दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जपली. पण त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सात्वंन करायलाही वेळ मिळाला नाही. ’अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. साऱ्यांश चर्चा करुनच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांचे भाषण झाले. भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, पक्षाचे उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुरलेकर, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक अरुण डोंगळे, युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, पी. डी. धुंदरे, तेजस्विनी राहुल पाटील, बी. एच. पाटील, शंकरराव पाटील, भारत पाटील, संदीप पाटील, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर, सडोलीचे सरपंच अमित पाटील, प्रदीप माने, शिवाजीराव कारंडे, मधुकर जांभळे, शिवाजी आडनाईक, हंबीरराव वाळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदी उपस्थित होते.