आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : वाढदिवस म्हटलां की शुभेच्छांचा वर्षाव, आप्तस्वकियांकडून सत्कार सोहळा आणि सदिच्छा असं जणू समीकरणच बनलं आहे. काही जण पार्टी आयोजित करुन नातेवाईक व मित्रमंडळीसोबत गप्पांची मैफल जमवितात. तर कोण देवदर्शन, पर्यटन करतात. या साऱ्या माहौलमध्ये कोल्हापुरात तीस जुलै रोजी एक वाढदिवस मात्र हटके ठरत आहे. विवेकानंद शिक्षण संंस्थेच्या सचिव शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या वाढदिवसाला दरवर्षी संस्थेमध्ये एक नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी मांडली. संंस्थेच्या संचालक व व्यवस्थापन वर्गाने ही संकल्पना उचलून धरली. कॉलेज व्यवस्थापनाने या दोन्ही विद्या शाखेसाठी पाठपुरावा केला. आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षारंभी विवेकानंद कॉलेजमध्ये दोन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले. हे अनोखं गिफ्ट शैक्षणिक क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालकवर्गासाठी लाभदायक ठरत आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील आघाडीची संस्था. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून ४०७ ज्ञानशाखा आहेत.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ‘ज्ञान-विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार‘हे ब्रीद ठेवून संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेची शैक्षणिक कामगिरी आणि वाटचाल साऱ्यांनाच भूषणावह आहे. संस्थेतून लाखो विद्यार्थी ज्ञानार्जन करुन विविध क्षेत्रात चमकत आहेत. बापूजींचा तोच शैक्षणिक वारसा आणि कार्य संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे प्रभावीपणे चालवित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्या शुभांगी गावडे कार्यरत आहेत.
विवेकानंद शिक्षण संस्थेचा विस्तार, कामाचा व्याप या साऱ्याचा विस्तार करुन संस्था व्यवस्थापनने काही वर्षापूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी कौस्तुभ गावडे यांच्याकडे सोपविली. उच्चशिक्षित असलेल्या कौस्तुभ यांनी सीईओ म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर संस्थेतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काळानुरुप अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला.
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शुभांगी गावडे यांचा तीस जुलै रोजी वाढदिवस. या वाढदिनाचे औचित्य साधून संस्थेमध्ये दरवर्षी एक नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम सुरू होत. यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांचे मार्गदर्शन आणि संस्था संचालकांची साथ मोलाची ठरत आहे. २०२३ मध्ये या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. संस्थेने नवीन अभ्यासक्रम सुरू करताना त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल, करिअरसाठी फायदा होईल प्लसेमेंटसाठी उपयुक्त ठरेल या साऱ्या गोष्टीचा विचार करुन त्याला मूर्त रुप दिले जाते. यंदाही संस्था व विवेकानंद कॉलेजने पुढाकार घेत ३० जुलै रोजी पदव्युत्तर एमबीए व एमसीए या दोन नवीन विद्याशाखा सुरू केल्या आहेत. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार यांनी हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. तर संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू झालेल्या या विद्याशाखेच्या उद्घाटनसाठी अभिनेता सयाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे तर संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य विरेन भिर्डी, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, एमबीए विभागप्रमुख विराज जाधव, आर. के. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. दरम्यान वाढदिनाचे औचित् साधून नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा हा उपक्रमा वेगळा ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या व काम करु ईच्छिणाऱ्या मंडळीसाठी हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.