हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी वीस गावे बंद
schedule23 Mar 25 person by visibility 257 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात आसपासच्या वीस गावांत सोमवारी (२४ मार्च २०२५) बंद पुकारण्यात आला आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीच्यावतीने रविवारी (२३ मार्च) कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सोमवारी गाव बंदची घोषणा करण्यात आली. आमदार चंद्रदीप नरके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मतदारसंघातील लोकांसोबत मी आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा सोमवारच्या बैठकीत मांडणार असल्याचे नरके यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानभवनात हद्दवाढीसंबंधी बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी कृती समितीने धरणे आंदोलन करत हद्दवाढीला विरोध दर्शवला. सोमवारी पुकारलेल्या गाव बंद आंदोलनात गांधीनगर, पाचगाव, आंबेवाडी, कळंबा, वळीवडे, वाडीपीर, मुडशिंगी, बालिंगे, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, नागाव, नागदेववाडी, वळीवडे, वडणगे, उचगाव, उजळाईवाडी, शिरोली, शिंगणापूर, शिये, सरनोबतवाडी या गावात बंद पुकारण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी, ‘२०१७ मध्ये प्राधिकरणची स्थापना झाली. प्राधिकरणच्या माध्यमातून गावांचा विकास करण्याची घोषणा सरकारने केली होती. संतुलित विकास करुन टप्प्याटप्प्याने ही गावे समाविष्ठ करावीत. ग्रामीण जीवन उद्धवस्त होईल असा कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊ नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील जनतेचे म्हणणे ऐकावे.’अशा भावना विविध गावच्या सरपंच, सदस्यांनी व्यक्त केल्या.
हद्दवाढ विरोधी कृती समितीचे निमंत्रक उपसरपंच मधुकर चव्हाण, उत्तम आंबवडे, संदीप पाटोळे, बाळासाहेब वरुटे, किरण अडसूळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन चौगले, माजी सरपंच सचिन चौगुले, जोतिराम घोडके यांची भाषणे झाली. गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, वडणगेच्या सरपंच संगिता पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, नारायण पोवार, , एम. जी. पाटील, रवि पाटील, इंद्रजीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.