मॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !
schedule01 Apr 25 person by visibility 205 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागेकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. छाननी प्रक्रियेत प्रा. डॉ. मंजिरी मोरे, डॉ. एस. पी. हंगेरगीकर, प्रा. निशा मुडे-पवार, प्रा. डॉ. आर. के. निमट, प्रा. सुनील चव्हाण यांचे अर्ज वैध ठरले. तर भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेजचे प्रा डॉ. मनिष भाटिया यांच अर्ज अवैध ठरला. दरम्यान सुटाकडून उमेदवारी अर्ज भरलेले प्रा. सुनील चव्हाण हे चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. यामुळे सुटाकडून प्रा. आर. के. निमट हे एकच उमेदवार रिंगणात असतील.
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीकडून प्रा. डॉ. मंजिरी मोरे, प्रा. एस. पी. हंगेरगीकर हे उमेदवार आहेत. विद्यापीठातील सभा व निवडणूक विभागामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अॅकेडमिक कौन्सिलच्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत मॅनेजमेंट कौन्सिलसाठी दोन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. शिक्षक वर्गातून या दोन जागा निवडण्यात येणार आहेत. भाटिया हे अभ्यास मंडळाचे चेअरमन आहेत. शिक्षक वर्गातून उमेदवार निवडण्यात येणार असल्याने तो शिक्षकच असावा. या कारणास्तव भाटिया यांचा अर्ज अवैध ठरला.
दरम्यान उमेदवार प्रा. हंगेरगीकर यांच्या उमेदवारीवर प्रा. आर. के. निमट यांनी हरकत घेतली आहे. स्थायी समितीकडून अॅकेडमिक कौन्सिलवर प्रा. हंगेरगीकर यांची नियुक्ती केली आहे. तर शि्क्षक वर्गातून निवडून आलेल्या सदस्याची अॅकेडमिक कौन्सिलमधून मॅनेजमेंट कौन्सिलसाठी निवडणूक लढविता येते. हंगेरगीकर यांची अॅकेडमिक कौन्सिलवर स्थायी समितीकडून नियुक्ती झाली आहे. तेव्हा नियुक्त सदस्याचा अर्ज पात्र धरू नये. अॅकेडमिकवर निवडून आलेला सदस्यच मॅनेजमेंटसाठी उमेदवार असावा. तेव्हा त्यांचा अर्ज अवैध ठरवावा असा आक्षेप उमेदवार निमट यांच्याकडून नोंदविला आहे. यासंबंधीचे पत्र कुलगुरू डी. टी. शिर्के व सभा- निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्याकडे दिले आहे अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांनी दिली. यावर पाच एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.