महात्मा बसवेश्वरांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ
schedule18 Mar 25 person by visibility 115 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमालेअंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.
डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.
डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल उपस्थित होते.