स्वप्नांना बळ अन् संस्कारी शिक्षण ग्रामीण भागामध्ये देणारा शहीद पॅटर्न कौतुकास्पद : राज देशमुख
schedule08 Mar 26 person by visibility 44 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शहीद परिवारातील मुलामुलींची कामगिरी पाहता ग्रामीण भागातील शिक्षण अधिक संस्कारी आहे. मोठी स्वप्नं पाहिल्यास आपण ते पूर्ण करू शकतो हे शहीद परिवारातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अशा वाटचालीत डॉ. जगन्नाथ पाटील यांच्यासारखे अनुभवी मार्गदर्शक लाभणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.’ असे गौरवोदगार चांगुलपणाच्या चळवळीचे अध्यक्ष राज देशमुख यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या निसर्गदूत पुरस्कार वितरण आणि पारितोषिक वितरण समारंभ झाला. याप्रसंगी अतिथी म्हणून ते बोलत होते. वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने पत्रकार संदीप आडनाईक, बांबू रिसर्च फाउंडेशनचे पाटलोबा पाटील, आपत्कालीन जीवरक्षक व माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे, जंगल अभ्यासक दत्ता मोरसे, वृक्षमित्र वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अमोल बुढढे, वन्यजीव अभ्यासक विजय पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले, निसर्गमित्र राणीता चौगुले तसेच जीवरक्षक व निसर्ग संवर्धक बबिता जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा गौरव केला. ‘खेडोपाड्यातील व वाड्या-वस्त्यांमधील मुलींनीही या यशात मोलाचा वाटा उचलत नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवावी, हा संस्कार शहीद शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहे. याचे उदाहरण म्हणजे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी ‘निसर्गदूत’ पुरस्कार देण्यात येत आहे.’असे त्यांनी सांगितले.
युवा महोत्सव, विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थिनींच सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वैष्णवी डवरी यांनी जबाबदारी पहिली. प्रा.शुभांगी भारमल, प्रा. प्रतिज्ञा कांबळे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील पाटील यांनी आभार मानले. प्राचार्या सिद्धता गौड, प्राचार्य हिमांशू चव्हाण, प्राचार्य सरिता धनवडे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार उपस्थित होते.