गोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना
schedule07 Mar 26 person by visibility 53 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला दूध उत्पादकांना विशेष विमा संरक्षण देण्यासाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघ व दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माहिती पत्रकाचे अनावरण करून गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. गोकुळ शिरगाव येथे महिला दिनानिमित्त गोकुळ कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
२०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष’ म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या वतीने कष्टकरी दूध उत्पादक महिलांना सामाजिक व आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति दूध उत्पादक महिलांना दोन लाख रुपये इतके विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रारंभी संघाशी संलग्न सुमारे एक लाख दूध उत्पादक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम १५0 रुपये इतका निश्चित करण्यात आला. त्यापैकी ३० टक्के म्हणजे ४५ रुपये गोकुळ दूध संघाकडून अनुदान स्वरूपात भरली जाणार असून उर्वरित ७० टक्के रक्कम १०५ रुपये लाभार्थी महिलांकडून घेण्यात येणार आहे. संघ व विमा कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून अल्प विमा हप्त्या मध्ये मोठे विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न गोकुळने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेचा लाभ वय वर्ष १८ ते ७० वयोगटातील गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील दूध उत्पादक महिलांना घेता येणार आहे. या विम्याचा कालावधी एक वर्षाचा असणार असून या अंतर्गत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व, लाभार्थीच्या आई-वडील अथवा पतीचा अपघाती मृत्यू, अॅसिड हल्ला तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी नियमानुसार विमा भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबावर अचानक ओढवणाऱ्या संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
दुग्ध व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक वेळा अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटांमुळे कुटुंबावर आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी महिलांना सुरक्षिततेचा व आधाराचा हात देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.याप्रसंगी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, प्रकाश पाटील, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या मॅनेजर रिता सिन्हा, कॉ. बबली रावत, कॉ.स्मिता केरिमाने, श्रीमती पद्मजा आपटे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी होते.