२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्री
schedule09 Dec 25 person by visibility 21 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशी करीता गोकुळ श्री स्पर्धा होते. २०२५-२६ मधील स्पर्धेमध्ये एकूण ११४ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतला. यामध्ये केर्ली येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे म्हैस दूध उत्पादक विश्वास यशवंत कदम यांच्या जाफराबादी जातीच्या म्हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळी मिळून एकूण २१ लिटर ९५५ मिली लिटर इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला. गायीमध्ये रांगोळी येथील श्री कृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे गाय दूध उत्पादक युवराज विठ्ठल चव्हाण यांच्या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळी मिळून एकूण ३५ लिटर ८७० लिटर दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील चेअरमन सचिव संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
म्हैस दूध उत्पादनामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर कसबा नूल येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद विजय विठृठल दळवी यांच्या मालकीच्या जाफराबादी जातीच्या म्हैशीने सकाळ व संध्याकाळ मिळून २० लिटर ५२९ मिली इतके दूध दिले. गडहिंग्लज येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद वंदना संजय माळी यांच्या मालकीच्या जाफराबादी जातीच्या म्हैशीने सकाळ व संध्याकाळी मिळून एका दिवसाला १८ लिटर ७०० मिली दूध दिले. तर गाय गटामध्ये बोडकेनहट्टी बेळगाव येथील अष्टविनायक सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद महेश कल्लाप्पा तवनोजी यांच्या मालकीच्या एचएफ जातीच्या गायीने दिवसाला ३५ लिटर ८२० मिली इतके दूध देते. कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक येथील दिपक संभाजी सावेकर यांच्या मालकीच्या एचएफ जातीच्या गायीने ३५ लिटर ७८० मिली इतके दूध देऊन तिसरा क्रमांक मिळवला.