जयसिंगपुरात तलाठयाला काठीने मारहाण, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
schedule06 Jan 25 person by visibility 577 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी प्रशांत अशोक काळे यांना कार्यालयात काठीने मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.तीन जानेवारी २०२५ रोजी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, कोल्हापूर शाखेतर्फे निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. मारहाण करणाऱ्या राजेश नीळकंठ शिंदे या व्यक्तीस कठोर शिक्षा करावी. शिंदेने सरकारी कामात अडथळा आणत ग्राम महसूल अधिकारी काळे यांना काठीने मारहाण केली. तसेच ‘तुला रपा रपा मारुन टाकीन’ अशी धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील तलाठयांनी सोमवारी, सहा जानेवारी रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी सहभागी आहेत असे तलाठी संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल मनोहर काटकर, सरचिटणीस रणजीत संभाजी पाटील यांनी म्हटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घ्याव्यात व पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून मारहाण करणाऱ्यावर कडक शिक्षा व्हावी. याप्रश्नी न्याय मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे संघटनेने म्हटले आहे.